Newasa News : भेंडा बुद्रुकमध्ये संत नागेबाबा यात्रोत्सव उत्साहात सुरु; भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी
नेवासे तालुक्यातील भेंडा बुद्रुकचे जागृत ग्रामदैवत श्रीसंत नागेबाबा यांच्या वार्षिक यात्रेनिमित्त (Newasa News) तिसऱ्या श्रावणी सोमवारी हजारो भाविकांचा जनसागर उसळला होता.

Newasa News : नेवासे तालुक्यातील भेंडा बुद्रुकचे जागृत ग्रामदैवत श्रीसंत नागेबाबा यांच्या वार्षिक यात्रेनिमित्त (Newasa News) तिसऱ्या श्रावणी सोमवारी हजारो भाविकांचा जनसागर उसळला होता. यात्रेच्या दिवशी सकाळी नऊ वाजता संत नागेबाबांच्या पादुका व पवित्र गंगेच्या पाण्याची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली, तर दुपारी बारा वाजता बाबांच्या समाधीला विधिवत जलाभिषेक घालण्यात आला.
या यात्रेचे मुख्य आकर्षण ठरले ते भाविकांसाठी तयार करण्यात आलेला महाप्रसाद. तब्बल ५५ मोठ्या कढयांमध्ये तब्बल २७ हजार ५०० लिटर आमटी तयार करण्यात आली होती. उपस्थित भाविकांना जागेवरच आमटी-भाकरीचा लाभ देण्यात आला, तसेच हजारो भाविकांना घरोघरी नेण्यासाठीही आमटीचे वाटप करण्यात आले.
सायंकाळी पाच वाजता ज्ञानेश्वरी ग्रंथाची आणि रात्री पारंपरिक छबिना मिरवणूक (Newasa News) काढण्यात आली. कावडी मिरवणुकीसाठी केवळ पारंपरिक बँड व ढोल-ताशांचा वापर केल्यामुळे संपूर्ण उत्सव अत्यंत शिस्तबद्ध व शांततेत पार पडला.
यात्रेदरम्यान एका अनोख्या श्रद्धेचे दृश्य पाहायला मिळाले. लहान मुलांची करणी-धरणी, इडा-पीडा टळावी आणि त्यांना दीर्घायुष्य लाभावे यासाठी शेकडो मातांनी आपल्या चिमुकल्यांना रस्त्यावर झोपवले होते. संतांच्या पादुका असलेली पालखी खांदेकरी या बालकांच्या अंगावरून नेतात; पालखी अंगावरून गेल्यास बालकांचे सर्व संकट टळते, या अतूट श्रद्धेपोटी पालखी सोहळ्यात माता-भगिनींची मोठी गर्दी झाली होती.
यात्रेनिमित्त (Newasa News) श्रीक्षेत्र आळंदीच्या मिराबाई महाराज मिरीकर, आमदार विठ्ठलराव लंघे, माजी मंत्री शंकरराव गडाख, माजी आमदार पांडुरंग अभंग, आमदार बाळासाहेब मुरकुटे, काशिनाथ नवले, नागेबाबा पतसंस्थेचे अध्यक्ष कडूभाऊ काळे, ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे उपाध्यक्ष काकासाहेब नरवडे, कार्यकारी संचालक अनिल शेवाळे व जनरल मॅनेजर रवींद्र मोटे यांसह अनेक मान्यवरांनी समाधीचे दर्शन घेतले. यात्रेची सांगता मंगळवारी मिराबाई महाराज मिरीकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने होणार आहे.






