Newasa News : नेवासा तालुक्याला दिलासा: मुळा धरणाचे आवर्तन सोडले

नेवासा : नेवासा तालुक्यासाठी वरदान ठरलेल्या मुळा धरणाचे पाटपाण्याचे आवर्तन रविवारी सायंकाळी ६ वाजता सोडण्यात आले. यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे, अशी माहिती आमदार विठ्ठलराव लंघे – पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
आमदार लंघे – पाटील यांनी सांगितले की, शेतकऱ्यांच्या सततच्या मागणीनुसार जिल्ह्याचे पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे – पाटील यांच्याकडे पाण्याच्या आवर्तनासाठी पाठपुरावा केला होता. त्यानुसार काही दिवसांपूर्वी पालकमंत्री विखे – पाटील यांनी पाटबंधारे विभागाची बैठक घेऊन पाण्याच्या नियोजनाचा आढावा घेतला. या बैठकीला आमदार लंघे उपस्थित होते.
पालकमंत्र्यांनी पाटबंधारे अधिकाऱ्यांना आमदार लंघे यांच्या सूचनेनुसार पाण्याचे नियोजन करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार रविवारी सायंकाळी मुळा धरणातून आवर्तन सोडण्यात आले. या आवर्तनामुळे ऊस, बाजरी, मका, भुईमूग आणि फळबागांना मोठा दिलासा मिळणार आहे. पालकमंत्री विखे – पाटील आणि आमदार लंघे यांच्या राजकीय समन्वयामुळे शेतकऱ्यांच्या मागण्या तात्काळ पूर्ण होत असल्याने, भर उन्हाळ्यातही पाण्याची टंचाई कमी झाल्याचे शेतकऱ्यांमधून बोलले जात आहे.





