Newasa News : नेवाश्यात विठ्ठलनामात रंगली चिमुकली दिंडी; शिक्षिकासह पालकांचा उत्स्फूर्त सहभाग
विद्यार्थ्यांवर उत्तम संस्कार घडवण्यात नेहमीच अग्रेसर असणाऱ्या नेवासे (Newasa News) खुर्द येथील विवेकानंदनगर प्रभागातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आषाढी वारीनिमित्त अत्यंत उत्साहात 'बालदिंडी' सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

Newasa News : विद्यार्थ्यांवर उत्तम संस्कार घडवण्यात नेहमीच अग्रेसर असणाऱ्या नेवासे (Newasa News) खुर्द येथील विवेकानंदनगर प्रभागातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आषाढी वारीनिमित्त अत्यंत उत्साहात ‘बालदिंडी’ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
सध्या समाजात घडणाऱ्या उद्विग्नजनक घटनांच्या पार्श्वभूमीवर बालकांसमोर काय आदर्श ठेवावा, असा प्रश्न उभा राहत असताना, विवेकानंदनगरची ही शाळा सुसंस्कारांची ज्योत तेवत ठेवत चिमुकल्यांना सत्मार्गाची दिशा दाखवत आहे.
शाळेत राष्ट्रीय सणांच्या माध्यमातून राष्ट्रभक्तीचे धडे दिले जातात, तर विविध सांस्कृतिक उत्सवांतून परस्पर बंधुभाव आणि सामाजिक भान जपण्याची शिकवण दिली जाते. याच उपक्रमांचा एक भाग म्हणून सध्या राज्यभरात सुरू असलेल्या आषाढी वारीचे औचित्य साधून या बालदिंडीचे आयोजन करण्यात आले होते.
विठ्ठलनामात रंगले चिमुकले; भक्तिमय वातावरणाने नेवासे दुमदुमले
पंढरपूरच्या वाटेवर विठ्ठल आणि माऊलींच्या गजरात तल्लीन होणाऱ्या वारकऱ्यांचे चित्र पाहून या शाळेतील चिमुकल्यांनीही मंगळवारी अत्यंत भक्तीभावाने बालदिंडीत सहभाग घेतला. या दिंडीत विद्यार्थ्यांनी विठ्ठल-रुक्मिणी, गणपती बाप्पा, वीणेकरी, पखवाज वादक, टाळकरी आणि झेंडेकरी अशा विविध धार्मिक रूपांमध्ये सुरेख वेशभूषा साकारली होती.
हातात टाळ आणि खांद्यावर भगवी पताका घेऊन विठ्ठलनामाचा गजर करत निघालेल्या या चिमुकल्या वारकऱ्यांना पाहून संपूर्ण नेवासे शहर भक्तिमय झाले होते. या नयनमनोहारी सोहळ्यामुळे नेवासकर नागरिकांना प्रत्यक्ष ‘प्रति पंढरपूर’मध्येच आल्याचा मनस्वी साक्षात्कार झाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
शिक्षिकांचा पुढाकार अन् नागरिकांकडून कौतुकाचा वर्षाव
या अनोख्या आणि संस्कारक्षम उपक्रमाचे नियोजन शाळेच्या उपक्रमशील शिक्षिका अर्चना जंगम, सुनीता ननवरे आणि कविता बुचुडे यांनी केले होते. त्यांच्या या संकल्पनेचे संपूर्ण तालुक्यातून मोठे कौतुक होत आहे.
या बालदिंडी सोहळ्यात शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुनील मैंदाड यांच्यासह समितीच्या सदस्या कल्याणी बंदीवान, कावेरी नाबदे, लक्ष्मीबाई नाबदे, आरती कुंढारे, मोनिका बघेले, पायल मैंदाड, राणी अंबिलवादे आणि संजीवनी सातपुते या महिलाही आवर्जून सहभागी झाल्या होत्या. शाळेच्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक मूल्यांची वीण अधिक घट्ट होण्यास मदत होत असल्याच्या प्रतिक्रिया पालकांनी व्यक्त केल्या.




