नेवासा : कामिका एकादशीनिमित्त लाखो भाविकांनी घेतले माऊलींच्या “पैस” खांबाचे दर्शन

नेवासा – संत ज्ञानेश्वर माऊलींची कर्मभूमी तसेच ग्रंथराज ज्ञानेश्वरी व अमृतानुभव ग्रंथाचे रचनास्थान असलेल्या तीर्थक्षेत्र नेवासा येथे बुधवारी (दि.३१ जुलै) रोजी आलेल्या कामिका वद्य एकादशीच्या निमित्ताने मोठी यात्रा भरली होती. यावेळी संत ज्ञानेश्वर माऊलींचे मूर्तीमंत रूप असलेल्या “पैस” खांबाचे दिवसभरात लाखो भाविकांनी दर्शन घेतले. “पुंडलीक वरदे…हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम”ज्ञानोबा माऊली तुकाराम”च्या जयघोषाने नेवासे नगरी दुमदुमली होती. यावेळी शेकडो दिंड्यांनी माऊलींचा गजर करत हजेरी लावली होती.
कामिका एकादशीच्या निमित्ताने बुधवारी (दि.३१जुलै) रोजी पहाटे ४ च्या सुमारास संत ज्ञानेश्वर माऊलींच्या “पैस” खांबास वेदमंत्राचा जयघोष करत संत ज्ञानेश्वर महाराज मंदिराचे प्रमुख वेदांताचार्य हभप देविदास महाराज म्हस्के यांच्या प्रमुख उपस्थितीत नेवासा तालुक्याचे युवा नेते उदयनदादा गडाख ,डॉ. निवेदिता गडाख यांच्या हस्ते अभिषेक घालण्यात आला. यावेळी झालेल्या धार्मिक कार्यक्रमाचे पौरोहित्य वरखेड येथील प्रशांतदेवा भालेराव यांनी केले.
संत ज्ञानेश्वर माऊलींच्या यात्रेनिमित्त श्री क्षेत्र देवगड संस्थानचे प्रमुख महंत भास्करगिरीजी महाराज, उत्तराधिकारी प्रकाशानंदगिरीजी महाराज, नारायणगिरी महाराज आश्रमाचे प्रमुख महंत उद्धवजी महाराज मंडलिक, नेवासा तालुक्याचे आमदार शंकरराव गडाख, माजी आमदार संभाजीराव फाटके, माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विठ्ठलराव लंघे, ह.भ.प.भगवान महाराज जंगले शास्त्री, रामायणाचार्य नंदकिशोर महाराज खरात, ज्ञानेश्वर महाराज तांबे यांनी यावेळी भेट देऊन माऊलींच्या “पैस”खांबाचे दर्शन घेतले. आलेल्या सर्व मान्यवर व भाविकांचे संस्थानच्या विश्वस्त मंडळींसह स्वयंसेवकांनी स्वागत केले.
कामिका एकादशीच्या निमित्ताने संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर प्रांगणाच्या बाहेर दर्शनबारी रांगेसह मुख दर्शनाची व्यवस्था करण्यात आली होती. एक किलोमीटर अंतरापर्यंत दर्शन बारी रांग लागली होती. तर मंदिर प्रांगणात आमदार शंकरराव गडाख मित्र मंडळ, पंचगंगा सिड्स कंपनी, तर मंदिर रस्त्यावर उद्योजक रविराज तलवार यांच्या वतीने आलेल्या भाविकांसाठी मोफत शाबुदाना खिचडी प्रसादाचे वाटप करण्यात आले.
नेवासा फाटा ते नेवासा रस्त्यावर ही नागेबाबा पतसंस्था, आमदार बाळासाहेब मुरकुटे मित्र मंडळ, विविध तरुण मंडळांच्या वतीने पाणी बॉटल, शाबुदाणा खिचडी, केळीचे, चहाचे वाटप करण्यात आले.
संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर प्रांगणात महिलांना कृष्ण तुळशी रोपांचे मोफत वाटप करण्यात आले. माऊली मित्र मंडळाच्या वतीने उकडलेले शेंगदाणे नेवासा बुद्रुक येथील युवकांच्या वतीने चहाचे, तर नेवासा बुद्रुक येथील शिवांश इंडस्ट्रीजच्या वतीने उद्योजक अजय डौले यांच्या अधिपत्याखाली ५१ हजार पाणी बॉटलचे तर स्वर्गीय लोकनेते मारुतराव घुले पाटील पतसंस्थेच्या वतीने केळीचे तर सुवर्णकार समाज बांधवांच्या वतीने संत नरहरी महाराज मंदिर प्रांगणात पौष्टिक दुधाचे वाटप करण्यात आले. श्रीरामपूर रोडवरील माऊली भक्त विशाल पवार यांच्या वतीने शाबुदाणा चिवडयाचे वाटप करण्यात आले.
नेवासा शहरात येणाऱ्या माऊली भक्तांच्या सेवेसाठी प्रशासनाच्या वतीने तहसीलदार डॉ.संजय बिरादार तर पोलीस दलाच्या वतीने पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली चौकाचौकात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यात्रेच्या निमित्ताने बंदोबस्तासाठी नेवासा होमगार्ड जवानांनी निष्काम सेवा दिली. एरवी रस्त्यात फळ विक्री करणाऱ्या फळ विक्रेत्यांना रस्त्याच्या कडेला दुकाने लावण्यासाठी सोय करण्यात आली होती त्यामुळे भाविकांना रस्त्यावरुन जाण्यासाठी मार्ग सुकर होत होता.
नेवासा शहरातील एस टी स्टँड, मराठी शाळा, मार्केट कमिटीच्या प्रांगणात वाहन पार्किंगची व्यवस्था करण्यात आली होती. चारचाकी वाहनांसाठी नेवासा बुद्रुक येथून येणाऱ्या भाविकांसाठी विश्वेश्वर नाथबाबा विद्यालय प्रांगणात वाहन पार्किंगची व्यवस्था करण्यात आली होती.
कामिका वद्य एकादशीच्या निमित्ताने पहाटे पासूनच भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. संत ज्ञानेश्वर महाराज “पैस”खांब मंदिरासह मंदिराचे निर्माते वैकुंठवाशी हभप बन्सी महाराज तांबे यांच्या समाधी मंदिरावर केलेली विद्युत रोषणाई भाविकांचे आकर्षण ठरली होती. आषाढी वद्य एकादशी ही माऊलींची एकादशी असल्याने नेवासा शहरासह संत ज्ञानेश्वर मंदिर रस्ते गर्दीने फुलून गेले होते.
आषाढी वद्य कामिका एकादशीच्या निमित्ताने नेवासा तालुक्यासह राहुरी, श्रीरामपूर, शेवगाव या भागातील शेकडो दिंड्यांनी येथे ज्ञानोबा माऊली तुकाराम चा गजर करत येथे हजेरी लावली. यावेळी आलेल्या सर्व वारकऱ्यांचे मंदिर देवस्थानचे प्रमुख देविदास महाराज म्हस्के व विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष पांडुरंग अभंग यांच्यासह विश्वस्त मंडळाने स्वागत करून श्रीफळ प्रसाद देऊन सन्मान केला. तर आलेल्या दिंड्यांतील वारकरी भाविकांनी फुगडी रिंगण सादर करत माऊलींबद्दल असलेली श्रद्धा व भक्तिभाव वृद्धिंगत केला.
नेवासा एस टी स्टँड पासून ते ज्ञानेश्वर महाराज मंदिरापर्यंतच्या एक किलोमीटर अंतरावर गृहोपयोगी वस्तू, खेळणी, मिठाई, सौंदर्य प्रसाधने, कपडे अशा विविध प्रकारची स्टॉल थाटण्यात आली होती. या स्टॉल वरील साहित्य घेण्यासाठी महिला भाविकांची मोठी झुंबड उडाली होती.




