Newasa News : कौतुकास्पद ! माथाडी हमालाचा मुलगा बनला पोलीस उपनिरीक्षक
नेवासे कृषी उत्पन्न बाजार समितीत (Newasa News) माथाडी हमालीचे कष्टाचे काम करणाऱ्या एका सर्वसामान्य कुटुंबातील तरुणाने आपल्या जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रमाने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळवत पोलीस उपनिरीक्षक पदावर मजल मारली आहे.

Newasa News : नेवासे कृषी उत्पन्न बाजार समितीत (Newasa News) माथाडी हमालीचे कष्टाचे काम करणाऱ्या एका सर्वसामान्य कुटुंबातील तरुणाने आपल्या जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रमाने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळवत पोलीस उपनिरीक्षक पदावर मजल मारली आहे.
भानसहिवरा येथील दादासाहेब भाऊसाहेब टाके यांनी प्रतिकूल परिस्थितीवर (Newasa News) मात करत हे यश संपादन केले आहे. हमालाचा मुलगा पोलीस उपनिरीक्षक बनल्याने त्यांच्या या यशाचे कौतुक जिल्हाभरात होत आहे. या यशाने भानसहिवरा गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
कष्टकरी कुटुंबातील यश
दादासाहेब टाके यांचे वडील स्वर्गीय भाऊसाहेब टाके हे नेवासे मार्केट यार्डमध्ये माथाडी हमाल व तोलाई काम करत होते. आई लक्ष्मीबाई यांनी कुटुंबाची जबाबदारी सांभाळत मुलाच्या शिक्षणाला सतत पाठबळ दिले. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेत दादासाहेब यांनी MPSC परीक्षेत यश मिळवले.
त्यांच्या कुटुंबात बहिण आश्विनी आणि भाऊ रामेश्वर असे आहेत. मुलाच्या या यशाने संपूर्ण कुटुंबीयांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले आहेत. गावकऱ्यांनी देखील दादासाहेबांच्या या यशाचे भरभरून कौतुक केले आहे.
सत्कार सोहळा
दादासाहेब टाके यांच्या यशानिमित्त भानसहिवरा गावात सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजी सरपंच देविदास साळुंके यांनी दादासाहेब यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला.
दादासाहेब टाके यांच्या या यशामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी उदाहरण निर्माण झालेले असून त्यांनी “परिस्थिती कशीही असली तरी मेहनत आणि चिकाटीने यश मिळवता येते,” हा संदेश त्यांच्या यशातून अधोरेखित झालेला आहे असे मत यावेळी माजी सरपंच देविदास साळुंके यांनी व्यक्त केले आहे.
यावेळी माजी सरपंच अशोक बोरा, माथाडी कामगार संघटनेचे नेते बाबा आरगडे, मार्केट कमिटीचे संचालक हरिभाऊ शिंदे, अशोक कदम, सोमनाथ शेंडे, प्रीतम साळुंके, नेवासे तालुका सचिव स्टाफ सोसायटीचे माजी अध्यक्ष संपत नवले, कैलास टाके, महबूब शेख, अमोल गुजर, सुभाष शिंदे, जयराज काळे, अंगणवाडी सेविका रेणुका भणगे, देवगावचे गोपाळकृष्ण पाडळे आदी मान्यवर उपस्थित होते. ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दादासाहेब यांच्या यशाचा आनंद साजरा केला.






