Newasa News : कामिका एकादशी निमित्त ज्ञानेश्वर मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम

नेवासा : संत ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरी ग्रंथाची निर्मिती केलेल्या पैस खांब मंदिरात कामिका एकादशी निमित्त मोठी यात्रा भरली. सोमवार (दि. २१) रोजी लाखो वारकऱ्यांनी ज्ञानेश्वर मंदिरात दर्शनासाठी गर्दी केली होती. रात्रीपर्यंत मंदिर परिसरात भाविकांची मोठी गर्दी होती. यात्रेनंतर फुले, फळे, खाद्यपदार्थांची दुकाने आणि फराळ वाटपामुळे मंदिर परिसरात पत्रावळ्या, द्रोण यांसारख्या निर्माल्याचा खच साचला होता, ज्यामुळे स्वच्छता करणे आव्हानात्मक बनले होते.
मंदिर परिसर स्वच्छ ठेवण्याच्या उद्देशाने यशवंत सामाजिक प्रतिष्ठान, सोनईच्या वतीने माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली आणि प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष उदयन गडाख यांच्या नेतृत्वाखाली दरवर्षी स्वच्छता मोहीम राबवली जाते. मंगळवार (दि. २२) रोजी यशवंत सामाजिक प्रतिष्ठान, सोनई महाविद्यालय आणि श्री ज्ञानेश्वर महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने सकाळी ८ ते ११ या वेळेत संत तुकाराम महाराज मंदिर ते ज्ञानेश्वर मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत प्रतिष्ठानचे कार्यकर्ते आणि महाविद्यालयीन विद्यार्थी सहभागी झाले. विशेष म्हणजे, ज्ञानेश्वर देवस्थानचे महंत वेदांताचार्य ह. भ. प. देविदास महाराज म्हस्के यांनी स्वतः झाडू हातात घेऊन स्वच्छतेत सहभाग घेतला.
याप्रसंगी बोलताना महंत देविदास महाराज म्हणाले, “आषाढी वारीला पांडुरंगाच्या दर्शनासाठी गेलेले भाविक कामिका एकादशीला ज्ञानेश्वर मंदिरात दर्शनासाठी येऊन आपली वारी पूर्ण करतात. त्याचप्रमाणे यशवंत सामाजिक प्रतिष्ठानने पंढरपूर येथे आषाढी वारीनंतर स्वच्छता मोहीम राबवली आणि कामिका एकादशीच्या दुसऱ्या दिवशी ज्ञानेश्वर मंदिर परिसरात स्वच्छता करून स्वच्छतेची वारी पूर्ण केली.” त्यांनी पुढे सांगितले की, अशा उपक्रमांचा विस्तार गावागावातील मंदिर परिसरात व्हावा आणि साधू-संतांच्या विचारांना अनुसरून प्रतिष्ठान आणि विद्यार्थ्यांनी केलेल्या या कार्याचे कौतुक केले.
या मोहिमेत अभय गुगळे, आशिष कावरे, सुनील साळुंके, रामकीसन कांगुणे, डॉ. ईश्वर उगले, रणजित सोनवणे, दिनेश व्यवहारे, योगेश रासने, जालु गवळी, प्राचार्य डॉ. अरुण घनवट, उपप्राचार्या राधा मोटे, डॉ. बाळासाहेब खेडकर, प्रा. डॉ. जगदीश सोनवणे यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रा. अमोल जाधव यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांनी पसायदान गायन करून या उपक्रमाची सांगता केली.





