Newasa Accident News : खरवंडीत ट्रॅक्टर अपघातात मामासह दोन सख्या भाच्यांचा मृत्यू, तालुक्यात हळहळ
Newasa Accident News :

Newasa Accident News : शेती मशागतीचे काम आटोपून घरी परतत असताना ट्रॅक्टर पलटी होऊन झालेल्या भीषण अपघातात मामासह दोन सख्या लहान भाच्यांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना खरवंडी (ता. नेवासे) येथे मंगळवारी सायंकाळी घडली. या घटनेमुळे खरवंडी व सोनई परिसरात शोककळा पसरली असून गावात सन्नाटा पसरला आहे.
या अपघातात रामेश्वर बाळासाहेब मराठे (वय २७, रा. खरवंडी) तसेच त्यांचे सख्खे भाचे अभिषेक गणेश दरंदले (वय १६) व विजय गणेश दरंदले (वय १४, रा. सोनई) यांचा जागीच मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, रामेश्वर मराठे हे मंगळवारी दिवसभर शेतात रोटाव्हेटरच्या सहाय्याने मशागतीचे काम करत होते. सायंकाळी काम आटोपून ते ट्रॅक्टरने घरी परतत असताना चढावर अचानक ट्रॅक्टरचा ताबा सुटल्याने वाहन पलटी झाले. या भीषण अपघातात तिघांचाही जागीच मृत्यू झाला.
दरम्यान, अभिषेक व विजय हे दोघे भाऊ उन्हाळी सुट्टीसाठी मामाकडे खरवंडी येथे आले होते. सुट्टीचा आनंद घेत असतानाच काळाने त्यांच्यावर झडप घातल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मामाबरोबर दिवसभर शेतात फिरून आनंद लुटलेल्या या दोन्ही चिमुकल्यांचा सायंकाळी दुर्दैवी अंत झाल्याने गावकऱ्यांच्या डोळ्यांत अश्रू तरळले.
घटनेनंतर खरवंडी गावात शोकमय वातावरण निर्माण झाले. मंगळवारी रात्री उशिरा रामेश्वर मराठे यांच्यावर खरवंडी येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले, तर दोन्ही भावांवर सोनई येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेमुळे नेवासा तालुक्यातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.





