#NZWvINDW 2nd ODI : दुसऱ्या सामन्यातही महिला संघाचा पराभव
Updated On:

क्विन्सटाऊन – अमिलिया केरने केलेल्या शतकी खेळीच्या जोरावर यजमान न्यूझीलंडच्या महिला संघाने भारतीय महिला संघाचा 3 गडी राखून पराभव केला. या विजयासह या दोन संघात सुरू असलेल्या पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली.
प्रथम फलंदाजी करताना भारताच्या महिला संघाने 50 षटकांत 6 गडी गमावून 270 धावा उभारल्या. त्यात कर्णधार मिताली राजने 66, रीचा घोषने 65, तर सब्बीनेनी मेघनाने 49 धावांची खेळी केली. न्यूझीलंडकडून सोफी डिवाइनने 2 गडी बाद केले.
प्रत्युत्तरात न्यूझीलंड महिला संघाने 49 षटकांत 7 बाद 273 धावा करत विजय साकार केला. यामध्ये केरने दमदार शतकी खेळी केली. मॅडी ग्रीनने 52, तर सोफी डिवाइनने गोलंदाजीसह फलंदाजीतही चमकदार कामगिरी करताना 33 धावांची खेळी केली. भारताकडून दीप्ती शर्माने 4 गडी बाद केले. मात्र, ती संघाला विजय मिळवून देऊ शकली नाही.





