IND vs NZ CT Final 2025 : न्यूझीलंडची वाढली डोकेदुखी! भारताविरुद्धच्या फायनलला ‘हा’ स्टार खेळाडू मुकण्याची शक्यता

Matt Henry likely to miss IND vs NZ CT Final 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यापूर्वी न्यूझीलंडला मोठा धक्का बसू शकतो. खांद्याच्या दुखापतीमुळे न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज मॅट हेन्री अंतिम सामन्यातून बाहेर पडण्याची शक्यता आहे. मॅट हेन्री हा तोच गोलंदाज आहे, ज्याने गट सामन्यात भारताविरुद्ध ५ विकेट्स घेत टीम इंडियाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला होता.
हेन्रीला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या उपांत्य सामन्यादरम्यान दुखापत –
२ मार्च रोजी भारताविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात मॅट हेन्रीने शुबमन गिल, विराट कोहली, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा आणि मोहम्मद शमी यांना बाद केले होते. ३३ वर्षीय हेन्रीला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या उपांत्य सामन्यादरम्यान दुखापत झाली होती.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना रविवारी खेळला जाणार आहे. या स्पर्धेतील दोन्ही संघांमधील हा दुसरा सामना असेल. २ मार्च रोजी गट फेरीत भारत आणि न्यूझीलंड एकमेकांसमोर आले होते. या सामन्यात भारतीय संघाने ९ विकेट्सच्या मोबदल्यात २४९ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात, न्यूझीलंडचा संघ २०५ धावांवर सर्वबाद झाला होता.
प्रशिक्षक गॅरी स्टीड काय म्हणाले?
चॅम्पियन्स ट्रॉफी दरम्यान न्यूझीलंड संघ दुखापतींमुळे त्रस्त आहे. आता जखमी खेळाडूंच्या यादीत मॅट हेन्रीचे नावही जोडले जात आहे. संघाचे प्रशिक्षक गॅरी स्टीड म्हणाले, ‘मॅटच्या खांद्याला दुखापत झाली आहे. त्याला अस्वस्थ वाटत आहे. त्याचे स्कॅन झाले आहे. त्याचा अहवाल अद्याप आलेला नाही. आम्हाला आशा आहे की तो अंतिम सामन्यासाठी तंदुरुस्त होईल.
वेगवान गोलंदाज मॅट हेन्रीने चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मध्ये आतापर्यंत १० विकेट्स घेतल्या आहेत. तो या स्पर्धेत न्यूझीलंडचा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला आहे. अशा परिस्थितीत, त्याची दुखापत न्यूझीलंडच्या आशांना मोठा धक्का आहे. हेन्री त्याच्या संघातील सर्वात अनुभवी वेगवान गोलंदाज आहे. त्याने ९१ एकदिवसीय सामन्यांमध्ये १६५ विकेट्स घेतल्या आहेत.





