IRE vs ENG 2nd ODI : आयर्लंडविरुद्ध इंग्लंडने नोंदवला ऐतिहासिक विजय..! जाणून घ्या, का खास ठरला दुसरा वनडे सामना….

IRE vs ENG 2nd ODI (Women’s Cricket) : इंग्लंडच्या महिला क्रिकेट संघाने बेलफास्ट येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात आयर्लंड संघाचा दारूण पराभव केला. इंग्लंडने या सामन्यात 275 धावांनी विक्रमी विजय मिळवला आणि तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत 2-0 ने विजयी आघाडी घेतली. इंग्लंडच्या या विजयात फलंदाज टॅमी ब्युमाँटची शानदार खेळी आणि गोलंदाजांच्या उत्कृष्ट कामगिरीचा विशेष वाटा होता. या सामन्यातील विजयासह टॅमी हिने एक मोठा विक्रमही केला आहे.
टॅमी ब्युमॉन्टची विक्रमी खेळी…
इंग्लंडसाठी टॅमी ब्युमॉन्टने शानदार कामगिरी करत 139 चेंडूत 150 धावा केल्या. या खेळीत तिने 16 चौकार आणि एक षटकार लगावला. हे ब्युमाँटचे 10 वे एकदिवसीय शतक होते, ज्यामुळे तिने महिलांच्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडकडून सर्वाधिक शतके झळकावण्याचा विक्रम केला आणि या विक्रमासह नॅट सायव्हर-ब्रंटला मागे टाकले. ब्युमाँटच्या खेळीने इंग्लंडने 8 बाद 320 अशा मोठ्या धावसंख्येपर्यंत मजल मारली होती. ब्युमाँटनंतर फ्रेया केम्पनेही 47 चेंडूत 65 धाव करताना चमकदार कामगिरी केली. केम्पने चौथ्या विकेटसाठी 100 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली, ज्यामुळे इंग्लंडची धावसंख्या आणखी मजबूत झाली.
Not our day in Stormont.
▪️ England 320-8 (50 overs)
▪️ Ireland 45 (16.5 overs)WATCH: https://t.co/Jfy08rqipJ
SCORE: https://t.co/xCErTIP165
MATCH PROGRAMME: https://t.co/P8EOvtdJpO#BackingGreen #FuelledByCerta ☘️🏏 pic.twitter.com/QmicvYH2b4— Ireland Women’s Cricket (@IrishWomensCric) September 9, 2024
इंग्लंडच्या गोलंदाजांचा दबदबा…
इंग्लंडच्या 320 धावांच्या विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना आयर्लंडचा संघ अवघ्या 45 धावांवर गारद झाला. केट क्रॉसने 8 धावांत 3 बळी घेतले, तर लॉरेन फाइलरने 10 धावांत 3 बळी घेतले. याव्यतिरिक्त फ्रेया केम्प (2/7) आणि जॉर्जिया डेव्हिस (2/19) यांनी आयर्लंडच्या खालच्या फळीतील फलंदाजांना लवकर पॅव्हेलियनमध्ये पाठवले. आयरिश संघासाठी उना रेमंड-होईने सर्वाधिक 22 धावा केल्या आणि धावांमध्ये दुहेरी आकडा गाठणारी ती एकमेव फलंदाज होती.
या सामन्यात 275 धावांनी दणदणीत विजय मिळवत इंग्लंडने महिला वनडे क्रिकेटमध्ये आपल्या सर्वात मोठ्या विजयाचा नवा विक्रम प्रस्थापित केला. यापूर्वी 1993 मध्ये इंग्लंडने डेन्मार्कचा 239 धावांनी पराभव केला होता, जो त्यांचा सर्वात मोठा विजय होता.




