पुणे: स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी लंडनमध्ये केलेल्या वादग्रस्त भाषणाची सीडी न्यायालयातील सरतपासणीदरम्यान ‘प्ले’ न झाल्याने नवा ‘ट्विस्ट’ निर्माण झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर, या प्रकरणी अत्यंत महत्त्वाचा पुरावा म्हणून न्यायालयात दाखल केलेल्या दोन सीडी चालविण्यात याव्यात, अशी मागणी तक्रारदार सात्यकी सावरकरांच्या वकिलांनी केली. त्यावर, सरतपासणी घेण्यासाठी तक्रारदारांच्या वकिलांकडून वारंवार मुदतवाढ घेण्यात येत असल्याचा तीव्र आक्षेप राहुल गांधी यांच्या वकिलांनी नोंदविला आहे. राहुल गांधी यांनी मार्च २०२३ मध्ये लंडनमधील अनिवासी भारतीयांसमोर केलेल्या भाषणात स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी वादग्रस्त विधान केले होते. त्यामुळे सावरकरांचे नातू सात्यकी सावरकर यांनी राहुल गांधी यांच्याविरोधात मानहानीची याचिका दाखल केली आहे. लोकप्रतिनिधींवर दाखल दाव्यांची सुनावणी घेणाऱ्या पुण्यातील विशेष न्यायालयात या याचिकेची सुनावणी सुरू आहे. त्यामध्ये तक्रारदारांच्या वतीने अॅड. संग्राम कोल्हटकर यांच्याकडून राहुल गांधींची सरतपासणी घेऊन पुरावा नोंदविण्यात येत आहे. त्या अंतर्गत तक्रारदारांच्या वतीने पुरावा म्हणून कथित वादग्रस्त भाषण असलेली सीडी न्यायालयासमोर सादर करण्यात आली. मात्र, तांत्रिक अडचणींमुळे ही सीडी चालत नसल्याने अॅड. कोल्हटकर यांनी या प्रकरणी न्यायालयात पुरावा म्हणून सादर केलेल्या दोन सीडी चालविण्यात याव्यात, असा अर्ज केला. मात्र, न्यायालयाने हा अर्ज फेटाळला. त्यावर, अॅड. कोल्हटकर यांनी सरतपासणी व पुरावा नोंदविण्यासाठी मुदतवाढ मागितली. त्याला राहुल गांधींचे वकील अॅड. मिलिंद पवार यांनी फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम ३०९ अंतर्गत तीव्र आक्षेप नोंदविला. तक्रारदारांना सरतपासणी व पुरावा नोंदविण्यासाठी कोणतीही मुदतवाढ देण्यात येऊ नये, तातडीने पुरावा पूर्ण करण्याचे निर्देश द्यावे, अशी मागणी अॅड. पवार यांनी केली. या प्रकरणी, सरतपासणी व पुरावे नोंदविण्यासाठी तीन वेळा मुदतवाढ देण्यात आली आहे.