Lovkesh Bajaj : दिल्लीतील भीषण हॉटेल आग प्रकरणात नवा ट्विस्ट; मालकाची धक्कादायक कबुली
Lovkesh Bajaj : भीतीमुळे ते घरीही परतले नाहीत, तर बराच वेळ शहरातील रस्त्यांवर भटकत राहिले, असं त्यांनी पोलिस चौकशीत सांगितलं आहे.

Lovkesh Bajaj : दिल्लीतील मालवीय नगर परिसरातील ‘लेमन ग्रीन’ हॉटेल आणि गेस्टहाऊसमध्ये लागलेल्या भीषण आगीत मृतांचा आकडा 21 वर पोहोचला असून, या प्रकरणात हॉटेल मालक लवकेश बजाज यांच्या चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली आहे. आग लागल्याचे प्रत्यक्ष पाहूनही ते घटनास्थळावरून निघून गेल्याचे त्याने पोलिसांसमोर कबूल केले आहे.
दिल्ली पोलिसांच्या चौकशीदरम्यान लवकेश बजाज यांनी सांगितले की, आग लागल्याची माहिती मिळाल्यानंतर ते घटनास्थळी पोहोचले होते. मात्र, परिस्थिती पाहून ते घाबरले आणि तेथून निघून गेले. भीतीमुळे ते घरीही परतले नाहीत, तर बराच वेळ शहरातील रस्त्यांवर भटकत राहिले, असं त्यांनी पोलिस चौकशीत सांगितलं आहे.
चौकशीत बजाज यांनी सांगितले की, तीन वर्षांपूर्वी त्यांनी ही इमारत अहलुवालिया समूहाकडून खरेदी केली होती. यापूर्वी येथे खादीचे दुकान होते. इमारत मोडकळीस आलेल्या अवस्थेत असली तरी आवश्यक दुरुस्तीनंतर त्यांनी येथे हॉटेल-कम-गेस्टहाऊस सुरू केले. तसेच बी अँड बी (B&B) परवाना आणि पर्यटन व आरोग्य विभागाच्या आवश्यक परवानग्या घेतल्या होत्या. मात्र, त्यांच्या या दाव्यांची सत्यता पडताळून पाहण्यासाठी पोलीस सखोल तपास करत आहेत.
…अन् काढता पाय घेतला
प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, आग लागल्याची माहिती सकाळी 8.52 वाजता बजाज यांना देण्यात आली होती. त्यानंतर अवघ्या 15 मिनिटांत ते घटनास्थळी पोहोचले. मात्र, सुमारे 40 ते 45 मिनिटे परिसरात थांबल्यानंतर त्यांनी अचानक तेथून काढता पाय घेतला. याच काळात आग अधिक भडकली आणि आत अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी बचावकार्य सुरू असतानाच 21 जणांचा दुर्देवी मृत्यू झाला. अनेकांनी जीव वाचवण्यासाठी इमारतीच्या छतावरून उड्या मारल्याची माहिती समोर आली आहे.
या प्रकरणात लवकेश बजाज यांना अटक करण्यात आली असून त्यांना न्यायालयात हजर केले जाणार आहे. दिल्ली पोलीस त्यांच्या पोलीस कोठडीची मागणी करणार असल्याचे समजते. या प्रकरणाचा सखोल तपास दिल्ली पोलिस करत असून कोणती माहिती समोर येते हे पाहणे महत्वाचे असणार आहे.
मृतांच्या आणि जखमींच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत
दरम्यान, या दुर्घटनेबद्दल पंतप्रधान कार्यालय, दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता आणि नायब राज्यपाल तरनजीत सिंग संधू यांनी शोक व्यक्त केला आहे. पंतप्रधान कार्यालयाने मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 2 लाख रुपये आणि जखमींना 50 हजार रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे.
हेही वाचा : Eknath Shinde : धनुष्यबाणाची ताकद वाढली! भाजपला मोठा धक्का; ‘उबाठा’ गटाचे उपजिल्हाप्रमुख शिंदेसेनेत दाखल





