पुणे | नवे टर्मिनल रविवारपासून पुणेकरांच्या सेवत : मोहोळ

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – लोहगाव आंतरराष्ट्रीय विमानतळावरील नवे टर्मिनल सेवा पुरवण्यास सज्ज होत असून सीआयएसएफच्या जवानांच्या पूर्ततेनंतर आता तांत्रिक प्रक्रियाही पूर्णत्वास जात आहेत.
नवे टर्मिनल सुरु झाल्यानंतर पुणेकर प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. रविवारी (दि.१४ जुलै) नवे टर्मिनल सुरु होईल, अशी माहिती केंद्रीय नागरी विमान वाहतूक आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली.
नवे टर्मिनल सुरू करण्यासाठी सीआयएसएफच्या अतिरिक्त जवानांची आवश्यकता होती. यासाठी केंद्रीय राज्यमंत्री मोहोळ यांनी गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेऊन यासाठी पाठपुरावा केला होता, त्यास तातडीने परवानगी मिळून सीआयएसएफचे जवान पुणे विमानतळावर दाखलही झाले आहेत.
त्यानंतर पुढील तांत्रिक प्रक्रिया सुरू होती. हे कामही अंतीम टप्प्यात असून रविवारपासून हे टर्मिनल वापरात आल्याने जुन्या टर्मिनलवरील गर्दीचा भार कमी होण्यास मदत होणार आहे.
तर, नवे टर्मिनल कार्यान्वित करताना नव्या टर्मिनलच्या पहिल्या प्रवाशाला केंद्रीय राज्यमंत्री मोहोळ यांच्या हस्ते बोर्डिंग पास देण्यात आहे. एअर इंडियाच्या प्रवाशाला दि. १४ जुलैला दुपारी १:०० वाजता बोर्डिंग पास देत नवे टर्मिनल कार्यान्वित करणार आहेत, असे राज्यमंत्री मोहोळ यांनी सांगितले.





