Pravin Tarde : शेतकऱ्यांच्या पेट्रोल पंपाबाहेर रांगा, प्रवीण तरडेंच मोठं विधान, “ही दरवाढ त्यामुळे झाली आहे…”
श्री अंबाबाई मंदिर येथे जाऊन देवीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी शेतकरी आणि समाजातील वाढत्या नैराश्याबाबत चिंता व्यक्त केली.

Pravin Tarde | Petrol Diesel Prices : देशात पेट्रोल-डिझेलच्या सातत्याने वाढणाऱ्या किमतींमुळे सर्वसामान्य नागरिकांसह शेतकरी वर्गही अडचणीत सापडला आहे. इंधन दरवाढीचा थेट परिणाम शेतीकामांवर होत असून, मशागतपूर्व अनेक कामे खोळंबल्याचे चित्र राज्यभर पाहायला मिळत आहे.
पेट्रोल पंपांबाहेर वाहनधारकांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून, मे महिन्यात पेट्रोलच्या दरात तिसऱ्यांदा वाढ झाल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
दरम्यान, पेट्रोल-डिझेल दरवाढीच्या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध दिग्दर्शक आणि लेखक प्रवीण तरडे यांनी महत्त्वपूर्ण प्रतिक्रिया दिली आहे. आज ‘देऊळ बंद 2‘ या चित्रपटाच्या निमित्ताने ते संपूर्ण टीमसह कोल्हापूर दौऱ्यावर होते. (Pravin Tarde)
यावेळी त्यांनी करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर येथे जाऊन देवीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी शेतकरी आणि समाजातील वाढत्या नैराश्याबाबत चिंता व्यक्त केली. (Pravin Tarde)
प्रवीण तरडे म्हणाले, “महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या कमी व्हाव्यात, त्यांच्या मनात आशा निर्माण व्हावी, या उद्देशाने आम्ही ‘देऊळ बंद 2’ हा चित्रपट तयार केला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.
विशेष म्हणजे या सिनेमाची वेगळी जाहिरात आम्हाला करावी लागत नाही. जो मराठी प्रेक्षक हा चित्रपट पाहतो, तोच इतरांना त्याबद्दल सांगत आहे. हेच आमच्यासाठी मोठं यश आहे.”
ते पुढे म्हणाले, “हा चित्रपट शेतकऱ्यांच्या घराघरात पोहोचला पाहिजे. कारण शेतकरी हा आमच्यासाठी ‘प्रति परमेश्वर’ आहे. त्यांच्या मनात जर कधी निराशा किंवा चुकीचे विचार आले, तर ते दूर व्हावेत, हा या सिनेमामागचा खरा हेतू आहे. (Pravin Tarde)
आम्ही ‘देऊळ बंद’ नावाचा सिनेमा करत असलो तरी प्रत्येक मंदिरात जाऊन नमस्कार करत आहोत. कारण श्रद्धा आणि माणुसकी यांचा आदर कायम ठेवणं महत्त्वाचं आहे.”
तसेच पेट्रोल आणि डिझेल दरवाढीबाबतही त्यांनी प्रतिक्रिया दिली. “जागतिक स्तरावर सध्या जे काही चालवलं आहे, ही दरवाढ त्यामुळे झाली आहे. युद्धाचे संकट मिटेल त्यावेळी पेट्रोल आणि डिझेलचे आकडे पुन्हा एकदा कमी होऊ दे. आई अंबाबाईकडे हेच साकडे घातलं आहे,” असेही प्रवीण तरडे म्हणाले.
भारत त्याच्या क्रूड तेलाच्या गरजांचा जवळपास 88-90 टक्के आयात करतो, ज्यामुळे जागतिक तेलाच्या किंमतीतील हालचाली आणि रुपया-डॉलर विनिमय दरातील चढउतारांसाठी देशांतर्गत इंधनाच्या किंमती अत्यंत संवेदनशील बनतात.






