New Netflix Releases: OTT प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्स नेहमीच प्रेक्षकांसाठी नवनव्या आणि हटके वेब सीरिज तसेच चित्रपट घेऊन येत असतो. सप्टेंबर 2025 चे 15 दिवस उलटून गेले असून उरलेल्या दिवसांत नेटफ्लिक्सवर काही दमदार आणि चर्चेत असलेल्या सिनेमांचे तसेच सीरिजचे प्रीमियर होणार आहेत. यामध्ये आर्यन खानच्या दिग्दर्शनात तयार झालेल्या ‘द बॅड्स ऑफ बॉलीवूड’पासून ते लोकप्रिय जपानी सीरिज ‘ऐलिस इन बॉर्डरलँड’ सीझन 3 पर्यंत अनेक रिलीजचा समावेश आहे. चला तर पाहूया या महिन्याच्या उर्वरित दिवसांत नेटफ्लिक्सवर काय काय पाहायला मिळणार आहे. 1670: सीझन २ (17 सप्टेंबर) पोलंडमधील व्यंगात्मक कॉमेडी सीरिज ‘1670’ चा दुसरा सीझन प्रेक्षकांसमोर येणार आहे. डिसेंबर 2023 मध्ये पहिला सीझन प्रदर्शित झाला होता. आता या सीरिजच्या नव्या भागांत आणखी मनोरंजक कथा रंगणार आहे. द बॅड्स ऑफ बॉलीवूड (सप्टेंबर 2025) आर्यन खानच्या दिग्दर्शनातील ही पहिलीच सीरिज आहे. यात लक्ष्य, सहेर बंबा आणि बॉबी देओल मुख्य भूमिकेत आहेत. विशेष म्हणजे शाहरुख खान, आमिर खान आणि सलमान खान या तिघांचीही कॅमिओ झलक प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. त्यामुळे या सीरिजबद्दल प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. शी सेड मे बी (19 सप्टेंबर) ही एक रोमँटिक कॉमेडी फिल्म असून बुकेट अलाकस आणि एनजीओ द शॉ यांनी याचे दिग्दर्शन केले आहे. सेर्कन कायुलु आणि काडजा रॅमन यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा हलकाफुलका चित्रपट प्रेक्षकांचे मन जिंकण्यास सज्ज आहे. ऐलिस इन बॉर्डरलँड : सीझन ३ (25 सप्टेंबर) जपानची लोकप्रिय सायन्स-फिक्शन थ्रिलर सीरिज परत आली आहे. ताओ त्सुचिया आणि केंटो यामाझाकी अभिनीत ही सीरिज जबरदस्त व्हिज्युअल्स आणि रहस्यकथेने भरलेली असून तिचा तिसरा सीझन 25 सप्टेंबर रोजी नेटफ्लिक्सवर येणार आहे. हाऊस ऑफ गिनीज (25 सप्टेंबर) स्टीवन नाईट दिग्दर्शित हा ऐतिहासिक ड्रामा आठ भागांत प्रेक्षकांसमोर येणार आहे. सत्तासंघर्ष आणि ऐतिहासिक राजकारण या सीरिजमध्ये पाहायला मिळेल. नाइटमेअर ऑफ नेचर : केबिन इन द वूड्स (30 सप्टेंबर) महिन्याच्या अखेरीस नेटफ्लिक्सवर हा अमेरिकन माहितीपट प्रदर्शित होणार आहे. निसर्गाशी निगडित भितीदायक आणि रहस्यमय कथांचा यात समावेश आहे. एकूणच, सप्टेंबरचा दुसरा पंधरवडा नेटफ्लिक्सवर मनोरंजनाची पर्वणी घेऊन येत आहे. ऐतिहासिक ड्रामा, साय-फाय थ्रिलर, रोमँटिक कॉमेडी ते माहितीपट प्रत्येक प्रेक्षकासाठी काही ना काही खास पाहण्यासारखे आहे.