Chandrakant Patil : महाराष्ट्र राज्य सहकारी संघाच्या संचालक मंडळ कार्यालयाच्या उद्घाटन कार्यक्रमात मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मोठी घोषणा केली आहे. सहकार क्षेत्राची ताकद वाढवण्यासाठी आणि कुशल नेतृत्व घडवण्यासाठी राज्यातील सर्व विद्यापीठांमध्ये स्वतंत्र सहकार विभाग सुरू करण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले. तसेच, राज्य सहकारी संघासाठी प्रशिक्षण निधी पुन्हा सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव आगामी पावसाळी अधिवेशनात मांडला जाणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
महाराष्ट्र राज्य सहकारी संघाच्या संचालक मंडळ कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी प्रवीण दरेकर, सुनील कांबळे, दीपक तावरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. Chandrakant Patil
पाटील म्हणाले की, सहकाराची पायाभरणी मजबूत करण्यासाठी प्रशिक्षण अत्यावश्यक आहे. त्यामुळे सहकारी संस्थांकडून शुल्क आकारून प्रशिक्षण निधी उपलब्ध करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात येणार आहे. तसेच, राज्य सहकारी संघाच्या प्रशिक्षण केंद्रासाठी आवश्यक निधी देण्याचा निर्णयही अधिवेशनात घेतला जाईल. राज्यात स्वतंत्र सहकार विद्यापीठ स्थापन करण्यासाठीही प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, प्रवीण दरेकर यांनी सहकार क्षेत्राच्या बळकटीसाठी बंद पडलेला शिक्षण निधी तातडीने सुरू करण्याची मागणी केली. तसेच, सहकारी संस्थांच्या प्रतिनिधींसाठी अत्याधुनिक प्रशिक्षण केंद्र उभारण्यासाठी राज्य सरकारने पाच कोटी रुपयांचा निधी द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.

Chandrakant Patil : सहकार क्षेत्राला नवी चालना; विद्यापीठांत ‘सहकार विभाग’ सुरू करणार: मंत्री चंद्रकांत पाटील यांची घोषणा
या कार्यक्रमात सहकार क्षेत्रात नीतिमूल्यांची जपणूक आणि सक्षम नेतृत्वाची गरज अधोरेखित करण्यात आली. शालेय स्तरापासून सहकार संस्कृती रुजवण्यासाठी पाठ्यपुस्तकांमध्ये ‘सहकाराची प्रार्थना’ समाविष्ट करण्याचा प्रस्तावही मांडण्यात आला.
त्या वक्तव्यानंतर स्पष्टीकरण
कार्यक्रमादरम्यान चंद्रकांत पाटील यांनी प्रवीण दरेकर यांना सहकार खाते मिळावे, अशी सदिच्छा व्यक्त केली. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते. मात्र, “हे केवळ मित्रासाठी व्यक्त केलेले मत होते,” असे स्पष्टीकरण देत चंद्रकांत पाटलांनी या चर्चांना पूर्णविराम दिला.
हेही वाचा : Mrunmayi Deshpande : मृण्मयी देशपांडेची अनोखी ऑस्ट्रेलिया ट्रीप; चालत्या-फिरत्या घरातील प्रवासाचा अनुभव