Satara : महाराष्ट्र पर्यटन विकासासाठी खासगी सहभागाचे नवे पर्व: शंभूराज देसाई

कोयनानगर: महाराष्ट्राच्या पर्यटन क्षेत्राला अधिक गतिमान करण्यासाठी आणि जागतिक स्तरावर राज्याचे ब्रँडिंग घडवून आणण्यासाठी खासगी सहभाग घेण्यात येणार आहे.
मुंबई येथे मंत्रालयात पर्यटन मंत्री ना. शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली एक महत्त्वपूर्ण बैठक झाली. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ यांच्यातर्फे विविध प्रस्तावांचे सादरीकरण करण्यात आले. तसेच विविध खासगी कंपन्यांबरोबर संभाव्य सहकार्याबाबत सकारात्मक चर्चा झाली.
या बैठकीत अनेक धोरणात्मक निर्णय घेण्यात आले. नव्या पर्यटन प्रकल्पांचे आराखडे, आकर्षक सुविधा, स्थानिकांना रोजगार निर्माण करणाऱ्या योजना आणि डिजिटल माध्यमांतून जागतिक स्तरावर महाराष्ट्राचे सशक्त पर्यटन ब्रँडिंग यावर भर देण्यात आला.
पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी यावेळी स्पष्ट केले की, “पर्यटन हा केवळ सौंदर्यदृष्टीने नव्हे, तर राज्याच्या अर्थव्यवस्थेसाठीही महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळे खासगी सहभाग आणि धोरणात्मक निर्णयांच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या पर्यटनाला आंतरराष्ट्रीय दर्जा मिळवून देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे.”
या बैठकीस पर्यटन विभागाचे वरिष्ठ अधिकारी, पर्यटन महामंडळाचे पदाधिकारी आणि अनेक नामांकित खासगी क्षेत्रातील प्रतिनिधी उपस्थित होते. पर्यावरणपूरक पर्यटन (Eco-tourism), वारसा स्थळांवरील सर्किट्स, ग्रामीण आणि कृषी पर्यटन, तसेच चित्रपट पर्यटन यावर भर देण्याचा ठराव बैठकीत झाला.
यामुळे पर्यटन व्यवसायात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक अपेक्षित असून, महाराष्ट्रातील पर्यटन स्थळांचा कायापालट होण्याची शक्यता आहे. या उपक्रमामुळे स्थानिकांना अधिकाधिक रोजगार व स्वयंरोजगार संधी उपलब्ध होतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.





