अमृतकण : अरुण गोखले वाचावे धार्मिक करावा विचार । नित्य नवा दिवस जागृतीचा ।। माणसाने जीवन जगताना प्रत्येक दिवस हा कसा जगायचा, हे सांगणारा हा संदेश. हा संदेश दोनच ओळींचा असला, तरी तो लाखमोलाचा आहे. कारण सामान्यत: काय होते की, तुम्ही आम्ही मागील पानावरून पुढे असे आयुष्य जगत असतो. आपला आज उगवतो पण तो मुळी भलं मोठं भल्या बुऱ्याचं, चांगल्या वाईटाचं गाठोडं हे आपल्या सोबत घेऊन. काल काय झालं? कोण काय म्हणालं? कोण आपल्याशी कसं वागलं? कोणाच्या वागण्याने, बोलण्याने आपण सुखावलो अथवा दुखावलो, याचा विचार करतच आपला आजचा दिवस चालू होतो. मग आज आपणही त्याच्याशी तसंच वागायचं का? हे असले नको ते विचार घेऊन आपण आपल्या दिवसाची सुरुवात करतो, तिथेच आपली फार मोठी चूक होते. खरं म्हणजे जो दिवस गेला त्याबरोबर कालचं सारं संपलं, असंच मानायला हवं. काल जे काही भलंबुरं झालं, मतभेद झाले, भांडणे झाली, वाद झाले ते विसरून नव्या आशेने आपण नव्या दिवसाची नव्या उमेदीचे सुरुवात करायला हवी. मी माझ्या जीवनातला आजचा दिवस आनंदात, सुखासमाधानात आणि सत्कर्मात घालविणार. मला कुणाचं चांगलं करता आलं नाही, कोणाशी चांगलं बोलता, वागता आलं नाही तर निदान मी वाईट वागणार नाही, वाईट बोलणार नाही, कुणाला दुखावणार नाही. हा विचार मनात घेऊनच नव्या दिवसाची सुरुवात करायला हवी. त्यासाठी हा सांगावा आहे. असं वाचा की ज्या वाचण्याने तुम्ही वाचाल. अशी जागृकता ठेवा की तुमचं कोणतंही नुकसान होणार नाही. धार्मिक आणि मार्मिक वाचनाची सुरुवात ही नकारात्मक विचारांचे परिवर्तन घडविणारी असते. वाचनाने विचारांना दिशा मिळते, विचार बदलले की आपले वर्तन बदलते आणि वर्तन बदलले की आपोआपच त्याचे होणारे परिणाम आपोआप जाणवतात. प्रत्येक दिवशी आपण आपल्याच भल्यासाठी ही जागरुकता बाळगायला हवी. मग ती आपल्या स्वत:च्या स्वास्थ्याची असेल, बचतीची असेल, जपाव्या लागणाऱ्या नातेसंबंधाची असेल किंवा आत्मकल्याणार्थ प्रेरित करणाऱ्या साधना मार्गाची असेल. प्रत्येक ठिकाणी आपण जागृत राहायलाच हवे. कळत नकळत आपल्या हातून घडलेल्या चुका दुरुस्त करत, तुटू पाहणारे धागे जोडत आणि दुरावणारी नाती प्रेमाने, आपुलकीने जवळ आणत गेलो, तर आपले जीवन आनंदादायी अन् सुखीसमाधानी व्हायला नक्कीच मदत होईल.