अमेरिकेतही नवीन विषाणूची लागण, मात्र….!

डेन्व्हर (अमेरिका) – ब्रिटनमध्ये नव्याने सापडलेल्या करोनाच्या नवीन विषाणूची बाधा अमेरिकेत कोलोरॅडो येथील एका व्यक्तीला झाली असल्याचे आढळून आले आहे. मात्र ही व्यक्ती ब्रिटनला गेलेली नव्हती. तसेच ब्रिटनवरून परतलेल्या कोणाचाही त्याच्याशी संपर्क आलेला नव्हता.
हा रुग्ण 20 वर्षांचा युवक आहे. डेन्व्हरमधील ग्रामीण भागात रहाणारा या युवकाकापर्यंत हा नवीन विषाणू पोहोचला कसा, असा प्रश्न कोलोरॅडोच्या अधिकाऱ्यांना पडला आहे.
आतापर्यंत हा नवीन विषाणू अमेरिकेत दुर्मिळ असल्याचेच मानले जात आहे. पहिल्यांदा ब्रिटनमध्ये आढळलेला या विषाणूचा संसर्ग अमेरिकेत प्रवासी पार्श्वभुमी नसलेल्या व्यक्तीपर्यंत झाला, याचाच अर्थ नोव्हेंबर किंवा डिसेंबरमध्ये ब्रिटनवरून परतलेल्यांच्या माध्यमातूनच हा अमेरिकेत पोहोचला असावा.
असे सिएटलमधील फ्रेड हचिन्सन कॅन्सर रिसर्च सेंटरमध्ये कोविड-19 च्या साथीवर संशोधन करणारे वैज्ञानिक ट्रेवर बेडफोर्ड यांनी सांगितले.
या उदाहरणामुळे अमेरिकेत नव्या विषाणूची नवी साथ पसरण्याचा धोका उत्पन्न झाला आहे. आता लस अधिक लवकर उपलब्ध होण्याची गरज आहे. कारण लस उपलब्ध होण्यापेक्षा विषाणूचा प्रादुर्भाव फैलावण्याचा वेग अधिक असल्याचे दिसते आहे, असेही बेडफोर्ड म्हणाले.
नव्या विषाणूचा संसर्ग झालेला हा माणूस एल्बर्ट काउंटीमधील डेन्व्हरच्या दक्षिण-पूर्वेस विलगीकरणामध्ये आहे, अशी माहिती राज्याच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली. एल्बर्ट काउंटी हा भाग डेन्व्हरच्या शहरी भागापासून दूर ग्रामीण भागात आहे.
कोलोरॅडोमध्ये नव्या विषाणूचा संशयित बाधित सापडण्याचे हे दुसरे उदाहरण आहे. दुसरा संशयित बाधितही एल्बर्ट काउंटीतीलच आहे. दोघेही त्या काउंटीचे रहिवासी नाहीत. त्यामुळे विषाणू आणखी भागात असण्याची शक्यता आहे.





