चिंबळी : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ही विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची गुरुकिल्ली असून, पालकांनी आपल्या मुलांना शिक्षणासाठी जिल्हा परिषद शाळेतच प्रवेश द्यावा, असे आवाहन खेड तालुका पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी अमोल जंगले यांनी केले. मोई (ता. खेड) येथील एका कार्यक्रमात ते बोलत होते. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण व्हावी, यासाठी अल्ट्रा कॉर्पोरेट कंपनीच्या सीएसआर निधीतून बांधण्यात आलेल्या वर्गखोल्या, अंगणवाडी, संगणक आणि सीसीटीव्ही असलेल्या कॉम्प्युटर लॅबचे उद्घाटन अल्ट्रा कंपनीचे संचालक अशोक भोसले, प्रमोद भोसले, समीर भोसले आणि यश भोसले यांच्या हस्ते झाले. यावेळी गटशिक्षणाधिकारी अमोल जंगले, कुरूळी केंद्रप्रमुख हिरामण कुसाळकर, भोसले कुटुंब, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व संचालक, मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, माजी सरपंच, उपसरपंच, ग्रामस्थ आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रसंगी अल्ट्रा कंपनीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचा ग्रामपंचायत आणि शाळेच्या वतीने शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि ट्रॉफी देऊन सत्कार करण्यात आला, अशी माहिती शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा नेत्रा गवारे आणि उपाध्यक्ष जावेद शेख यांनी दिली. मोई (ता. खेड) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत इयत्ता पहिली ते सातवीपर्यंत सुमारे ५०० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मात्र, शिक्षकांची कमतरता असल्याने ग्रामस्थांनी शिक्षक नेमणुकीची मागणी केली. या मागणीचा विचार करून येत्या १५ दिवसांत शिक्षक नेमणूक करण्याचे आश्वासन गटशिक्षणाधिकारी जंगले यांनी दिले.