नेवासा: वरखेडच्या श्रीमहालक्ष्मी देवी यात्रेला १७ एप्रिलपासून प्रारंभ

नेवासा – बहुजन समाजाचे आराध्यदैवत असलेल्या नेवासा तालुक्यातील श्रीक्षेत्र वरखेड येथील श्रीमहालक्ष्मी देवीच्या यात्रा उत्सवाला गुरुवार, १७ एप्रिल २०२५ पासून भव्य प्रारंभ होत आहे. या यात्रेसाठी मंदिर समिती, स्थानिक प्रशासन आणि ग्रामस्थांनी नियोजन पूर्ण केले असून, भाविकांच्या सेवेसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज आहे.
१७ एप्रिल रोजी युवकांनी कावडीने आणलेल्या पवित्र गंगाजलाने श्रीमहालक्ष्मी देवीला अभिषेक होईल. रात्री ८ वाजता वेदमंत्रांच्या जयघोषात होमहवनाचा कार्यक्रम पार पडेल. यात्रेच्या मुख्य दिवशी, १८ एप्रिलला सकाळी ११ वाजता कहार व भोई समाजातर्फे पैठणहून आणलेल्या पालखीची विधिवत पूजा होऊन गावात भव्य मिरवणूक काढली जाईल.
भाविकांच्या गर्दीचा विचार करून मंदिर ट्रस्टने दर्शनासाठी रांगेत शिस्तबद्ध व्यवस्था केली आहे. नेवासा, शेवगाव, गंगापूर, श्रीरामपूर आणि नगर येथून जादा बसेसची सोय करण्यात आली आहे. यात्रेच्या नियोजनासाठी प्रशासनाने आधीच बैठक घेतली असून, परिविक्षाधीन पोलीस अधिकारी संतोष खाडे यांनी पोलीस प्रशासनाच्या पूर्ण सहकार्याचे आश्वासन दिले आहे. तसेच, अवैध व्यवसायांना आळा घालण्याची तंबीही दिली आहे.
श्रीमहालक्ष्मी देवी मंदिर देवस्थानचे उपाध्यक्ष लक्षाधिश दाणे, सचिव कडूबाळ गोरे पाटील, सरपंच विनोद ढोकणे, उपसरपंच विलास उंदरे, विश्वस्त नवनाथ वाघ, रंगनाथ पवार, रामचंद्र कुंढारे, रावसाहेब कुंढारे, देविदास शिरसाठ, किशोर शिरसाठ, रामदास गोरे, भगवान जगधने, बाळासाहेब शिरसाठ, पोपट शिरसाठ, सुरेश शिरसाठ यांच्यासह वरखेड ग्रामस्थांनी भाविकांना यात्रेत सहभागी होऊन दर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.





