नेवासा: समाजात अनेक धडधाकट तरुण टवाळकीत वेळ वाया घालवत असताना, नेवासा तालुक्यातील रांजणगांव देवी येथील आप्पासाहेब शिवाजी कापसे (वय ३१) यांने जन्मत: दोन्ही हातांना आलेल्या अपंगत्वावर जिद्दीने मात करत सर्वांसमोर आदर्श ठेवला आहे. शासनाच्या कोणत्याही सवलतींचा आधार न घेता, आप्पासाहेब नेवासा न्यायालयात अॅड. के.एस. ढेरे, अॅड. एस.एस. सोनवणे आणि अॅड. ए.पी. रिंधे यांच्या हाताखाली लिखाणावळीचे काम करतो. आपल्या सुंदर अक्षरांनी आणि अचूक कामगिरीने ते वकिली कारभार सांभाळत कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. विशेष म्हणजे, ते स्वत:च्या पल्सर दुचाकीवरून दररोज कामाला येतात. आप्पासाहेब यांना आई-वडील, भाऊ आणि चार विवाहित बहिणी असून, त्यांचेही लग्न झाले आहे. त्यांना एक मुलगी आहे. त्यांचे कुटुंब आनंदी वातावरणात गुण्यागोविंदाने राहते. अपंगत्वाला भांडवल न करता, त्यांनी स्वत:च्या हातांनी आपले नशीब घडवले. त्यांची ही कामगिरी पाहून समाजातील अनेकांना आश्चर्याचा धक्का बसतो. न्यायालयात येणाऱ्या लोकांमध्ये त्यांच्या कर्तृत्वाची चर्चा होत आहे. आप्पासाहेब यांनी आपल्या धाडसाने आणि मेहनतीने केवळ स्वत:चेच आयुष्य उजळले नाही, तर इतर दिव्यांगांसाठीही प्रेरणादायी उदाहरण ठरले आहेत. त्यांचा हा प्रवास खऱ्या अर्थाने समाजाला दिशादर्शक आहे.