नेवासा: ‘त्या’ ग्रामविकास अधिकाऱ्यांना तत्काळ निलंबित करा; पंचायत समिती कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू

नेवासा – ग्रामपंचायतपातळीवर शासनाच्या आदेशाला चक्क केराची टोपली दाखवली. नियमाप्रमाणे या नोंदीत कामगारांना ९० दिवसांचा दाखला देण्याचा आदेश जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी यांनी दिला आहे. मात्र नेवासा तालुक्यातील ग्रामविकास अधिकारी या मजूर कामगारांना दाखल देत नाहीत. ते शासनाच्या आदेशाचा भंग करत असल्याच्या निषेधार्थ गुरुवार (दि.२६) रोजी सकाळी ११ वाजेपासून नेवासा पंचायत समिती कीर्यालयाच्या आवारात बांधकाम कामगारांनी बेमुदत आंदोलन सुरु केले आहे. समर्पण फांऊडेशचे अध्यक्ष कामगार नेते डॉ.करणसिंह घुले यांच्या नेत्तृत्वाखाली हे आंदोलन सुरु आहे.
समर्पण फाऊंडेशनचे घुले यांच्या नेत्तृत्वाखाली सुमारे तीन महिण्यांपुर्वी अ.नगर जिल्हा परिषद कार्यालयावर नोंदणीकृत बांधकाम कामगारांनी ९० दिवसांचा दाखला ग्रामसेवकांनी देण्याच्या मागणीसाठी आंदोलन केले होते. या आंदोलनाची दखल जिल्हा परिषदेने घेवून बांधकाम कामगारांना ९० दिवसांचा दाखला देण्याचे आदेशही यावेळी दिलेले होते. मात्र तरीही शासन आदेशाचा भंग करत नेवासा तालुक्यातील ग्रामविकास अधिकारी जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवत नोंदीत कामगारांना दाखला दिला जात. त्यामुळे बांधकाम कामगार मजुरांनी पंचायत समिती कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरु केले आहे.
शासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संबंधितांना आदेश देवूनही ग्रामविकास अधिकारी कामगारांना दाखले देण्यास टाळाटाळ करत आहेत म्हणून या कारणास्तव नेवासा पंचायत समिती येथे गटविकास अधिकाऱ्यांच्या दालनात यापुर्वी धरणे व ठिय्या आंदोलनही करण्यात आले होते. तरीही ग्रामसेवकांनी अडेलतट्टूपणाची भूमिका कायम ठेवली असून बांधकाम कामगारांना ९० दिवसांचा दाखला देण्यास टाळाटाळ करणाऱ्या ग्रामसेवकांना सेवेतून तत्काळ निलंबित करा. या मागणीसाठी बेमुदत धरणे आंदोलन सुरु आहे.





