नेवासा: मुकिंदपूरात प्लास्टिक कचरा संकलन मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद

नेवासा : नेवासा तालुक्यातील मुकिंदपूर ग्रामपंचायतीच्यावतीने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार राबवण्यात आलेल्या प्लास्टिक कचरा संकलन मोहिमेला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शालेय विद्यार्थ्यांनी जनजागृती रॅली काढून या मोहिमेसाठी प्रबोधन केले.
मुकिंदपूर ग्रामपंचायत प्रांगणापासून या मोहिमेचा शुभारंभ झाला. यावेळी ग्रामपंचायत मार्गदर्शक सतीश निपुंगे, सरपंच कल्पना निपुंगे, उपसरपंच कानिफनाथ कराडे, ग्रामपंचायत अधिकारी संतोष खंडागळे, पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी सुरेश पाटेकर, कृषी अधिकारी स्वाती थिगळे यांच्यासह श्रीराम विद्यालयाचे शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले.
जय श्रीराम विद्यालयाचे मुख्याध्यापक जनार्धन शेंडे यांच्या प्रेरणेने आणि शिक्षक राजेंद्र काळे, गणेश एडके यांच्या मार्गदर्शनाखाली पाचवी ते दहावीच्या सुमारे २०० विद्यार्थ्यांनी रॅलीद्वारे गावात जनजागृती केली. मोहिमेदरम्यान ग्रामपंचायत प्रांगण आणि ग्रामीण रुग्णालय परिसरातील प्लास्टिक कचरा गोळा करून त्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावण्यात आली. यामध्ये अंगणवाडी सेविका, आरोग्य सेविका, आशा स्वयंसेविका आणि महिला बचत गटांच्या सदस्यांचा सहभाग होता.
या मोहिमेत सतीश निपुंगे, संजय पाटील निपुंगे, प्रसाद खंडागळे, पोलीस पाटील आदेश साठे, कैलास निपुंगे, अमोल घोडके यांच्यासह विद्यालयातील शिक्षक, विद्यार्थी आणि ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. या उपक्रमामुळे गावात प्लास्टिकमुक्तीच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलले गेले आहे.





