Nevasa : नेवासा तालुक्यात रस्ते खड्यात; तक्रार करणाराला दमबाजी ?
Nevasa : नेवासा तालुक्यातील रस्त्यांच्या निकृष्ट कामांवर नागरिकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. ठेकेदारांकडून दबाव आणला जात असल्याचा आरोप असून चौकशीची मागणी होत आहे.

Nevasa : नेवासा तालुक्यात विकासकामांच्या नावाखाली सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामांच्या गुणवत्तेवर प्रश्न उपस्थित होत आहेत. काही ठिकाणी रस्ते तयार झाल्यानंतर काही दिवसांतच खडी उखडत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून केल्या जात आहेत. डांबराचे प्रमाण कमी आणि खडीचे प्रमाण अधिक असल्याचा आरोपही होत आहे. त्यामुळे शासनाच्या निधीचा योग्य वापर होतोय का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
तक्रारदारांना दमबाजीचा आरोप
रस्त्यांच्या निकृष्ट कामाबाबत सोशल मीडियावर किंवा सार्वजनिकपणे आवाज उठविणाऱ्या नागरिकांना ट्रोल केले जात असल्याच्या तक्रारी आहेत. काही ठेकेदारांकडून तक्रारदारांवर दबाव आणण्यासाठी गुंडांचा वापर केला जात असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागावर प्रश्न
रस्त्यांच्या कामांची गुणवत्ता तपासण्याची जबाबदारी संबंधित यंत्रणेची आहे. मात्र, काम सुरू असताना अधिकारी आणि अभियंते प्रत्यक्ष पाहणी करतात का, मोजमाप व गुणवत्तेची तपासणी होते का, असे प्रश्न उपस्थित होत आहेत. निकृष्ट रस्त्यांमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत असून अपघाताचा धोका वाढत असल्याचेही नागरिकांचे म्हणणे आहे.
‘रस्ते निकृष्ट असल्यास कारवाई कधी होणार?’ असा सवाल नेवासेकरांकडून उपस्थित केला जात आहे. सध्या तालुक्यातील बहुतांश रस्त्यांवर खड्डे पडलेले आहेत. अपघाताचा धोका कायम आहे.





