नेवासा: श्री महालक्ष्मीदेवी यात्रेची जय्यत तयारी

नेवासा – महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या नेवासा तालुक्यातील श्री क्षेत्र वरखेड येथे श्री महालक्ष्मीदेवीच्या यात्रा सोहळ्यासाठी जोरदार तयारी सुरू आहे. हा भव्य सोहळा १७ आणि १८ एप्रिल २०२५ रोजी होणार असून, यंदाच्या यात्रेची माहिती देवस्थानचे सचिव कडूभाऊ गोरे यांनी दिली.
चैत्र कृ ४, शके १९४७ म्हणजेच गुरुवार, १७ एप्रिल २०२५ रोजी रात्री ८:३० वाजता होम सोहळ्याने यात्रेला प्रारंभ होईल. तर चैत्र कृ ५, शके १९४७ म्हणजेच शुक्रवार, १८ एप्रिल रोजी मुख्य यात्रा उत्सव साजरा होईल. या दिवशी सकाळी ११ वाजता पैठण येथून कहार आणि भोई समाजाकडून आणलेल्या पालखीची पूजा ट्रस्टी आणि गावकऱ्यांच्या हस्ते होईल. रात्री आकर्षक शोभेच्या दारूकामाचा कार्यक्रमही आयोजित करण्यात आला आहे.
भाविकांसाठी विशेष व्यवस्था
यात्रेनिमित्त नगर, नेवासा, शेवगांव, श्रीरामपूर, गंगापूर आदी ठिकाणांहून एस.टी. महामंडळाच्या खास बसगाड्यांची सोय करण्यात आली आहे. भाविकांना या सोहळ्यात मोठ्या संख्येने सहभागी होऊन देवीच्या दर्शनाचा लाभ घ्यावा आणि कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन श्री महालक्ष्मीदेवी मंदिर देवस्थान ट्रस्टच्या सर्व विश्वस्तांनी आणि वरखेड ग्रामस्थांनी केले आहे.
या यात्रेच्या निमित्ताने भक्तांना श्रद्धा आणि उत्साहाचा अनोखा संगम अनुभवायला मिळणार आहे.





