नेवासा: जिल्ह्याच्या ‘मिनी मंत्रालया’त झेंडा फडकविण्यासाठी राजकीय हलचालींना वेग; पडद्यामागून रणनीतीची चाचपणी

नेवासा (राजेंद्र वाघमारे) : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेवासा तालुक्यातील राजकारण पुन्हा एकदा तापू लागले आहे. जिल्ह्याच्या ‘मिनी मंत्रालय’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्थानिक स्वराज संस्थांवरील सत्ता मिळविण्यासाठी मोठे पक्ष, प्रादेशिक संघटना आणि इच्छुक उमेदवार पडद्यामागून सक्रिय झाले आहेत.
आरक्षण जाहीर होण्याच्या प्रतीक्षेत असतानाच महायुती आणि महाविकास आघाडीतील बड्या नेत्यांनी आपापल्या गोटात मोहरे सजवण्यास सुरुवात केली आहे. काही ‘वजनदार’ इच्छुकांना उमेदवारीचे आश्वासनही दिले गेले असून, ते ‘जर-तर’च्या चौकटीत असल्यामुळे स्पष्ट भूमिका टाळली जात आहे. या साऱ्या घडामोडींमुळे कार्यकर्ते आणि पदाधिकारी अलर्ट मोडवर आले आहेत.
दरम्यान, तालुक्यातील काही प्रादेशिक पक्ष आणि संघटनांनीही या निवडणुकीत संधी साधत ‘हम भी किसीसे कम नहीं’ असा निर्धार करत रिंगणात उतरण्याचे संकेत दिले आहेत. निवडणूक जिंकून ‘आपला झेंडा फडकवावा’ यासाठी या लहान पक्षांची धडपड अधिकच तीव्र होत आहे. त्यांच्या या हालचालींचा थेट फटका मोठ्या पक्षांना बसणार की तेच ठरणार ‘किंगमेकर’? याकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले आहे.
आरक्षण जाहीर होण्यापूर्वीच संभाव्य गण-गटांवर मोर्चा साधण्याचा प्रयत्न सुरु असून, ‘गाव जिंकलं की गट ठरतो’ या भूमिकेने अनेक इच्छुक ‘जावई शोध’ मोहिमेत दिसत आहेत. काही नेते उमेदवारीसाठी महायुती की महाविकास आघाडी यातील गोंधळात अडकलेले असून, योग्य संधीची वाट पाहत ‘वेट अँड वॉच’च्या भूमिकेत आहेत.
विशेष म्हणजे, काही राजकीय खेळाडू दोन्ही आघाड्यांच्या संपर्कात राहून ‘देखो मगर प्यार से’चा खेळ खेळत आहेत. यामुळे तालुक्यात गुप्त बैठका, कोअर टीमचा गाठीभेटींचा धडाका आणि मांडवलीच्या हालचालींना चांगलाच वेग आला आहे.
निवडणुकीचा बिगुल वाजण्यापूर्वीच राजकीय रंगमंचावर पडद्या आडून घडणाऱ्या हालचालींनी नेवासाच्या राजकीय वातावरणात चुरस निर्माण झाली आहे. ही निवडणूक कोणासाठी तारक ठरेल आणि कोणासाठी मारक, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. मात्र, मतदारराजा कोणाला स्वीकारतो आणि कोणाला नाकारतो, हे ठरवणारा अंतिम निर्णय हाच या लढतीत निर्णायक ठरेल, यात शंका नाही.




