नेवासा: डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त उद्या दंगलकार कवी नितीन चंदनशिवे यांचे प्रबोधनात्मक व्याख्यान

नेवासा – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त नेवासा येथे गुरुवारी, (१७ एप्रिल) सायंकाळी ६ वाजता सुप्रसिद्ध व्याख्याते आणि दंगलकार कवी नितीन चंदनशिवे यांच्या व्याख्यानाचा आणि कवितांचा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीचे मार्गदर्शक अँड. संजय सुखदान यांनी ही माहिती दिली.
नेवासा एस.टी. कॉर्नर रस्त्यावर होणाऱ्या या कार्यक्रमात चंदनशिवे डॉ. आंबेडकरांचे विचार, कार्य आणि संघर्ष यांवर प्रकाश टाकतील. समाजात जनजागृती व्हावी, हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ येथील नितीन चंदनशिवे यांना केशवसुत, साहित्यभूषण, नारायण सुर्वे, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे, महात्मा फुले पुरस्कार यासह महाराष्ट्रातील ७५ पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.
त्यांनी अनेक साहित्य संमेलनांचे अध्यक्षपद भूषवले असून, राज्यस्तरीय कवी संमेलनांमध्ये त्यांचा महत्त्वपूर्ण सहभाग आहे. कुवेत, रशिया, ऑस्ट्रेलिया, केंब्रिज आणि लंडन येथे त्यांनी कवितांचे सादरीकरण केले आहे. लवकरच त्यांचा काव्यसंग्रह आणि कथासंग्रह प्रकाशित होणार आहे.
या प्रबोधनात्मक व्याख्यान आणि कवितांच्या कार्यक्रमाला शिवप्रेमी, भीमप्रेमी, राष्ट्रप्रेमी आणि सर्वधर्मीय नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन अँड. संजय सुखदान आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीने केले आहे.





