नेवासा : नेवासा तालुक्यातील कुकाणा प्राथमिक शाळेत शाळा सोडल्याचा दाखला आणि निर्गम उतारा मागणाऱ्या पालकांची अडवणूक आणि अवाजवी फी मागणीचा गंभीर प्रकार समोर आला आहे. याबाबत तक्रार करणाऱ्या पालकांवरच दबाव आणण्याचा आणि दमदाटीचा आरोप आहे. तालुका शिक्षण विभागाने या प्रकरणी चौकशी सुरू केली असून, एका महिला विस्तार अधिकाऱ्याची चौकशीसाठी नियुक्ती करण्यात आली आहे. एका पालकाने शाळेतील अडवणूक आणि फी मागणीबाबत शिक्षण विभागाकडे तक्रार केली. माहितीच्या अधिकाराखाली अर्ज केल्यानंतरही शाळेकडून दिरंगाई झाल्याने तक्रार तीव्र झाली. यावर संबंधित शिक्षक आणि केंद्रप्रमुखाने तक्रारदाराचा अर्ज सोशल मीडियावर व्हायरल करत शासकीय गोपनीयतेचा भंग केल्याचा आरोप पालकांनी केला. शिक्षकांच्या घरभाडे भत्त्याबाबत विचारणा करणाऱ्या पालकांना दमदाटी केल्याचाही आरोप आहे. या प्रकाराने पालकांमध्ये तीव्र संताप आहे. शिक्षण विभागाच्या कागदपत्रांचा व्हॉट्सअॅप ग्रुपवर गैरवापर केल्याप्रकरणी संबंधितांवर कारवाईची मागणी होत आहे. चौकशीअंती सत्य समोर येईल, असा विश्वास तक्रारदारांनी व्यक्त केला आहे. पालकांनी ठाम भूमिका घेतल्याने दोषींवर कारवाई होण्याची शक्यता आहे.