नेवासा : नागापूर सोसायटीवर महायुतीचा झेंडा; आमदार लंघे यांच्या नेतृत्वाखाली भाजप-शिवसेनेचा बिनविरोध विजय

नेवासा – नेवासा तालुक्यातील नागापूर येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या नुकत्याच पार पडलेल्या पंचवार्षिक निवडणुकीत आमदार विठ्ठलराव लंघे-पाटील यांच्या नेतृत्वाखाली भाजप-शिवसेना आघाडीने बिनविरोध विजय मिळवत आपला पहिला झेंडा रोवला आहे. या विजयामुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण असून, नवनिर्वाचित चेअरमन, व्हाइस चेअरमन आणि संचालक मंडळाचं कौतुक होत आहे.
या निवडणुकीत भाजप-शिवसेना प्रणित पॅनलला कोणताही विरोध झाला नाही. विरोधी गटाला पॅनल उभं करण्यातही अपयश आलं. अॅड. विश्वासराव काळे आणि अॅड. संभाजी काळे यांनी या पॅनलचं नेतृत्व केलं. निवडणुकीत चेअरमनपदी अशोक काळे आणि व्हाइस चेअरमनपदी सुरेश लवांडे यांची बिनविरोध निवड झाली. नवनिर्वाचित संचालक मंडळात अॅड. विश्वासराव गडाख, आयुष काळे, नितीन काळे, विलास काळे, भाऊसाहेब कापसे, सुदाम काळे, लक्ष्मण गोरे, रत्नमाला काळे, संगिता काळे आणि हिरा नवथर यांचा समावेश आहे.
आमदार विठ्ठलराव लंघे-पाटील यांनी नवनिर्वाचित संचालक मंडळाचा सत्कार केला. नागापूर सोसायटीच्या निवडणुकीत प्रथमच भाजप-शिवसेनेने विजय मिळवल्याने महायुतीच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त करत नव्या संचालक मंडळाला शुभेच्छा दिल्या आहेत. या विजयाने आमदार लंघे-पाटील यांच्या नेतृत्वाला आणखी बळ मिळाल्याचं दिसून येत आहे.





