नेवासा: पाथरवाला येथे खोडवा ऊस व्यवस्थापनाचा शेतकरी मेळावा उत्साहात संपन्न

नेवासा- नेवासा तालुक्यातील पाथरवाला येथे सिंजेंटा फाउंडेशन इंडिया आणि पर्यावरण संरक्षण यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ऊस प्रात्यक्षिक क्षेत्र भेट आणि शेतकरी मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. खोडवा उसाच्या पाचटाचे शास्त्रीय व्यवस्थापन या विषयावरील प्रात्यक्षिक आणि तांत्रिक चर्चा शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक ठरली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार पांडुरंग अभंग तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून माजी कुलगुरू व कृषी शास्त्रज्ञ डॉ. अशोकराव ढगे उपस्थित होते. डॉ. ढगे यांनी मार्गदर्शन करताना म्हणाले, “जमिनीचे आरोग्य हा ऊस उत्पादनवाढीचा पाया आहे. सेंद्रिय खत, जिवाणू खत आणि रासायनिक खतांचा समतोल वापर आवश्यक आहे. जमिनीतील सेंद्रिय कर्ब कमी होत असून, क्षारांचे प्रमाण वाढले आहे. शेतकऱ्यांनी पाणी व्यवस्थापन, सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर आणि जैविक कीडनियंत्रणावर भर द्यावा.”
प्रगतशील शेतकरी देवीदास खाटीक यांच्या शेतावर खोडवा पाचट व्यवस्थापनाचे प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आले होते. शेकडो शेतकऱ्यांनी याचे निरीक्षण केले. सिंजेंटा फाउंडेशनचे पवन थोरात यांनी बदलत्या हवामानानुसार शेतीतील नावीन्यपूर्ण प्रयोगांची माहिती दिली. सल्लागार समीर मिर्झा यांनी हवामानपूरक शेतीच्या उपाययोजना सुचवल्या, तर उदय वडीडी यांनी नवीन तंत्रज्ञानावर मार्गदर्शन केले. बारामती येथील लोकनेते ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या ९५ जणांच्या टीमनेही या प्रयोगांचा अभ्यास केला.
कार्यक्रमाचे उद्घाटन निखिल बॉईज यांच्या हस्ते झाले. नामदेव गव्हाणे, महेश नागुडे, अक्षय चेडे, प्रमोद जाधव, पुनम खाडे, प्रसाद साळुंखे आणि स्वामिनी खुरुद यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. पवन थोरात यांनी सूत्रसंचालन आणि आभारप्रदर्शन केले.





