नेवासा: नेवासा तालुक्यातील देडगांव येथील शेतकरी संतोष भाऊराव टांगळ (वय ३८) यांनी शेतजमिनीला जाण्या-येण्यासाठी व शेतीच्या मशागतीसाठी रस्ता मिळावा, या मागणीसाठी मंगळवार (दि.१९) पासून देडगांव येथील कामगार तलाठी कार्यालयासमोर अमरण उपोषण सुरू केले आहे. यापूर्वी एक महिन्यापूर्वीही टांगळ यांनी याच मागणीसाठी उपोषण केले होते. तेव्हा नेवासा तहसीलदार कार्यालयाने रस्ता देण्याचे लेखी आश्वासन दिल्याने उपोषण मागे घेण्यात आले होते. मात्र, महिना उलटूनही प्रशासनाने आश्वासन पूर्ण न केल्याने संतप्त टांगळ यांनी पुन्हा अमरण उपोषणाचा पवित्रा घेतला आहे. मौजे देडगांव येथील गट नंबर ५८४/१ (अ) आणि ५८३/१ मधील शेतजमिनीला रस्ता मिळण्यासाठी टांगळ यांनी महसूल अधिनियम १९६६ च्या कलम १४३ नुसार नायब तहसीलदारांकडे अर्ज केला होता. पहिल्या उपोषणात नायब तहसीलदार, मंडलाधिकारी आणि कामगार तलाठी यांनी रस्ता देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, आश्वासनाच्या पूर्ततेसाठी कोणतीच कार्यवाही न झाल्याने टांगळ यांच्या उभ्या पिकांचे मोठे नुकसान होत आहे. आज उपोषणाचा दुसरा दिवस असूनही प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने टांगळ यांनी रस्ता खुला होईपर्यंत उपोषण सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला. “माझ्या जीवाचे काही बरेवाईट झाल्यास याला प्रशासन जबाबदार असेल,” असा इशारा त्यांनी दिला. सामाजिक संघटनांनी या प्रकरणाची तातडीने दखल घेण्याची मागणी केली आहे.