नेवासा: संत ज्ञानेश्वर मंदिर मार्गावर दिशादर्शक फलकांची उभारणी

नेवासा : संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर, नेवासा येथे सोमवार, दि. २१ जुलै रोजी कामिका एकादशी निमित्त मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येणार असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने या पार्श्वभूमीवर विशेष उपाययोजना राबविल्या आहेत. मंदिर मार्गावर दिशादर्शक फलकांची उभारणी करण्यात येत असून या उपक्रमाचे भाविक व स्थानिक नागरिकांकडून स्वागत केले जात आहे.
संत ज्ञानेश्वर मंदिराच्या दिशेने येणाऱ्या भाविकांना योग्य मार्गदर्शन मिळावे, तसेच गर्दीच्या काळात रहदारी सुरळीत राहावी यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून रस्ता दुरुस्ती आणि मार्गदर्शक फलक उभारणीची कामे युद्धपातळीवर सुरू आहेत. मंदिर परिसर तसेच मुख्य मार्गांवर हे फलक लावले जात असून, “संत ज्ञानेश्वर मंदिर” असा स्पष्ट उल्लेख त्यावर करण्यात आला आहे.
या फलकांमुळे प्रथमच दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांना दिशाभूल न होता सोप्या मार्गाने मंदिर गाठता येणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या या उपक्रमाचे भाविकांकडून विशेष कौतुक करण्यात येत आहे.





