Nevasa News : जागर रील महोत्सव २०२६ मध्ये प्रणव डहाळे यांची चमक; ड्रीम सिनेमा प्रोडक्शनला द्वितीय क्रमांक
Nevasa News : अहिल्यानगर जिल्हा पोलीस दलाच्या वतीने सामाजिक जनजागृतीसाठी आयोजित करण्यात आलेल्या ‘जागर रील महोत्सव २०२६’ या अत्यंत प्रतिष्ठेच्या स्पर्धेत नेवासे तालुक्याने मोठी बाजी मारली आहे.

Nevasa News : अहिल्यानगर जिल्हा पोलीस दलाच्या वतीने आयोजित ‘जागर रील महोत्सव २०२६’ या सामाजिक जनजागृती अभियानात नेवासे तालुक्यातील रीलस्टार प्रणव मधुसूदन डहाळे आणि त्यांच्या ड्रीम सिनेमा प्रोडक्शन टीमने उल्लेखनीय कामगिरी करत द्वितीय क्रमांक पटकावला. जिल्हाभरातील सुमारे ७० स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला होता. (Nevasa News)
महिला सुरक्षा आणि सामाजिक जागरूकता या विषयावर आधारित रील्स स्पर्धेत उत्कृष्ट सादरीकरण करणाऱ्या पाच विजेत्यांची निवड करण्यात आली. विजेत्यांना मानचिन्ह, प्रमाणपत्र आणि रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. ड्रीम सिनेमा प्रोडक्शनला गौरव ट्रॉफी आणि १५ हजार रुपयांचे रोख पारितोषिक प्रदान करण्यात आले. (Nevasa News)
या महोत्सवाचा पुरस्कार वितरण सोहळा अहिल्यानगर पोलीस मुख्यालयात पार पडला. यावेळी पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, पोलीस उपअधीक्षक डॉ. दिलीप टिपरसे, वैभव कलुबर्मे तसेच सायकलिंग क्लबचे संस्थापक गौरव फिरोदिया यांच्या हस्ते विजेत्या कलाकारांचा सन्मान करण्यात आला. (Nevasa News)
ड्रीम सिनेमा प्रोडक्शनचे निर्माता विनोद बनकर यांच्यासह किरण डहाळे, दिनेश सरगेये, प्रणव डहाळे, नितीन धुमाळ, सिद्धार्थ नागपुरे आणि उमेश डहाळे हे यावेळी उपस्थित होते. मान्यवरांनी कलाकारांच्या सर्जनशीलतेचे कौतुक करत सामाजिक संदेश प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांचे अभिनंदन केले. (Nevasa News)
रील्ससारख्या आधुनिक माध्यमाचा प्रभावी वापर करून महिला सुरक्षा आणि सामाजिक जनजागृतीचा संदेश सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यात ड्रीम सिनेमा प्रोडक्शनने यश मिळवले आहे. या उल्लेखनीय कामगिरीमुळे प्रणव डहाळे आणि त्यांच्या संपूर्ण टीमवर सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. (Nevasa News)





