नेवासा: खडका रस्त्याची चाळण, नागरिक हैराण; आमदार लंघेंनी लक्ष घालण्याची मागणी

नेवासा : छत्रपती संभाजीनगर-अहिल्यानगर महामार्गावरील खडका रस्त्याची अक्षरशः चाळण झाली असून, याकडे लोकप्रतिनिधी आणि अधिकारी दुर्लक्ष करत असल्याने नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. नेवासा-खडका रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहनचालक आणि प्रवाशांची कसरत होत आहे. मार्केट यार्डजवळ काही अंतर चांगला रस्ता असला, तरी पुढे मोठमोठे खड्डे वाहनचालकांची निराशा करतात. या रस्त्यामुळे हाडे खिळखिळी होतात, वाहनांचे नुकसान होते, तर काहींचा जीवही गेला आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाने यापूर्वी किरकोळ डागडुजी केली, पण खड्ड्यांचे प्रमाण वाढतच आहे. आषाढी एकादशीला आम आदमी पक्षाने वृक्षारोपण करत आंदोलन केले होते, तरीही परिस्थिती जैसे थे आहे. दोन ठेकेदारांना रस्त्याचे काम देण्यात आले, पण कामाला मुहूर्त लागत नाही. खडका, नागझिरी, हनुमानवाडी परिसरातील नागरिकांनी आमदार विठ्ठलराव लंघे-पाटील यांनी हा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी केली आहे.
युवा नेते अनिल ताके यांनी सर्वपक्षीय आंदोलनाची गरज व्यक्त केली. “निवडणुकीत रस्त्याची चर्चा होते, पण प्रत्यक्षात आश्वासनांपलीकडे काही होत नाही. आता मोठे आंदोलन आवश्यक आहे,” असे त्यांनी सांगितले. नागरिकांनीही प्रशासनाला सहकार्य करत रस्त्याच्या दुरुस्तीसाठी दबाव वाढवण्याची मागणी केली आहे.





