नेवासा नगरीला केंद्रिय मार्ग निधी योजनेतंर्गत रस्ते कामांसाठी निधी उपलब्ध करून द्यावा: आमदार विठ्ठलराव लंघे-पाटील

नेवासा: देशाच्या नकाशावर धार्मिक तिर्थक्षेत्र असलेल्या नेवासा नगरीला भाविकांना जोडण्यासाठी केंद्रिय मार्ग निधी योजनेतंर्गत रस्ते कामासाठी निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याककडे केली आहे. यासंदर्भात लंघे पाटील यांनी मंत्री गडकरी यांना निवेदन दिले आहे.
मराठी भाषेचे उगमस्थान असणाऱ्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर मंदिर आणि जगविख्यात श्रीक्षेत्र शनिशिंगणापूरसह देवगड तसेच वरखेड येथील महालक्ष्मी देवस्थानचा कायापालट करण्यासाठी या धार्मिक तिर्थक्षेत्र असलेल्या पुण्यभूमीला जोडण्यासाठी रस्ता कामासाठी मोठा निधी उपलब्ध करुन देण्याची मागणी आमदार विठ्ठलराव लंघे-पाटील यांनी केली आहे. प्रवरानगर येथे केंद्रिय रस्ते वाहतूक मंंत्री नितीन गडकरी यांच्याकडे त्यांनी यासंदर्भात निवदेन सूपूर्त केले आहे.
नेवासा तालुका हा धार्मिकदृष्ट्या जगाच्या नकाशावर असल्यामुळे संत ज्ञानेश्वर मंदिर, शनिशिंगणापूर ,श्रीक्षेत्र देवगड देवस्थान आणि वरखेड येथील महालक्ष्मी मंदिर येथे दर्शनासाठी भाविक-भक्त मोठ्या प्रमाणावर येत असतात. या तिर्थक्षेत्राच्या रस्त्यांची दुर्दशा झालेली आहे. यामुळे दळणवळणाच्या दृष्टीने भाविकांचे मोठे हाल होत आहेत. त्यामुळे आपण या रस्त्यांना केंद्रीय मार्ग निधी योजने अंतर्गत मंजूरी देवून निधी उपलब्ध करुन द्यावा, अशी मागणी करणारे निवेदन करत आमदार लंघे पाटील यांनी मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे मागणी केली आहे.





