नेवासा: वरखेड नगरीत महालक्ष्मी मातेचा जयघोष

नेवासा : नेवासा तालुक्यातील वरखेड येथील श्री महालक्ष्मी देवीच्या दर्शनासाठी मंगळवारी (६ मे) हजारो भाविकांनी गर्दी केली. “आई राजा उदो उदो, वरखेड माता की जय”च्या जयघोषाने वरखेड नगरी दुमदुमली. पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. पोतराजांनी डफाच्या तालावर गायलेल्या देवीच्या गीतांनी वातावरण मंगलमय केले.
वरखेड येथील श्री महालक्ष्मी देवीचे मंदिर हे महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. नुकतीच येथील यात्रा संपन्न झाली असली, तरी दर मंगळवारी आणि शुक्रवारी भाविक दर्शनासाठी येथे येऊन नवसपूर्ती करतात. मंगळवारी मंदिर प्रांगणात विविध दुकाने थाटल्याने यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले. भाविकांना रांगेत दर्शन घेता यावे यासाठी देवस्थानचे सचिव कडूबाळ गोरे पाटील, उपाध्यक्ष लक्षाधीश दाणे, विश्वस्त नवनाथ वाघ, रंगनाथ पवार, रामचंद्र कुंढारे यांच्यासह स्वयंसेवकांनी चोख व्यवस्था केली.
शिवसेनेचे आमदार विठ्ठलराव लंघे पाटील, ज्येष्ठ शिवसैनिक बाळासाहेब जोंधळे, बाळासाहेब पंडित आणि अरुणा कनगरे यांनी मंदिराला भेट दिली. त्यांचा देवस्थानच्या वतीने श्रीफळ आणि प्रसाद देऊन सत्कार करण्यात आला. जोंधळे यांनी मंदिर परिसरातील रस्त्यांची दुरवस्था दूर करण्यासाठी लोकप्रतिनिधींनी लक्ष घालावे, अशी मागणी केली. देवस्थानने मंदिर विकासासाठी भाविकांकडून मदतीचे आवाहन केले. “दिवसभरात एक लाख भाविकांनी दर्शन घेतले,” असे सचिव गोरे पाटील यांनी सांगितले.





