नेवासा: वाकडीत स्वस्त धान्य दुकानातील माल काळ्या बाजारात विक्रीसाठी नेताना रंगेहाथ पकडला

नेवासा : वाकडी (ता. नेवासा) येथील स्वस्त धान्य दुकानातील रेशनकार्डधारकांसाठी मोफत वाटपाचे धान्य काळ्या बाजारात विक्रीसाठी नेत असताना ग्रामस्थांनी बुधवारी (दि. 23 जुलै) रंगेहाथ पकडले. 23 गोण्या (प्रत्येकी 50 किलो) तांदूळ आणि 13 गोण्या (प्रत्येकी 50 किलो) गहू, असे एकूण 36 गोण्या धान्य वाहनासह ताब्यात घेण्यात आले. याप्रकरणी नेवासा तहसीलदार डॉ. संजय बिरादार यांनी त्वरित कारवाई करत पुरवठा निरीक्षक आणि नेवासा पोलिसांना घटनास्थळी पाठवले.
बुधवारी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास वाकडी येथील धान्य दुकानातून सरकारी गोण्यातील धान्य दुसऱ्या गोण्यात भरून सुझुकी सुपर कॅरी (MH-12-VT-1778) या वाहनात लादले जात होते. ग्रामस्थ विठ्ठल काळे, विजय बनकर, विकास काळे आणि उत्तम कार्ले यांनी ही बाब पाहून तातडीने वाहनाला अडवले आणि तहसीलदारांना कळवले. पुरवठा निरीक्षक सुदर्शन दुर्योधन, कामगार तलाठी आणि पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मुद्देमाल ताब्यात घेतला.
ग्रामस्थांनी या दुकानदाराचा परवाना निलंबित करण्याची मागणी केली आहे. रेशनकार्डधारकांना धान्य मिळण्यासाठी अडवणूक होत असताना इतका मोठा साठा काळ्या बाजारात कसा गेला, असा सवाल उपस्थित करत स्टॉक आणि विक्री रजिस्टर तपासण्याची मागणी केली. तपासणीअंती परवाना निलंबित न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
सब गोलमाल है!
रेशनकार्डधारकांना धान्य मिळत नाही, मग 36 गोण्या धान्य काळ्या बाजारात कसे गेले? स्टॉक तपासून दुकानदारावर कडक कारवाई करावी, अन्यथा आंदोलन, असा इशारा वाकडीच्या ग्रामस्थांनी दिला.





