नेवासा: भालगाव जिल्हा परिषद शाळेतील भावी मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क; “पोल डे’निमित्त विशेष उपक्रम

नेवासा – शालेय जीवनातच विद्यार्थ्यांना लोकशाहीने बहाल केलेल्या मतदानाचा हक्काबद्दल जनजागृती व्हावी तसेच मतदार जनजागृती होऊन मतदानाची टक्केवारी वाढावी या उद्देशाने जिल्हा परिषद शाळा भालगाव मधील उपक्रमशील पदवीधर शिक्षक राहुल आठरे यांच्या मार्गदर्शनाने सातवीच्या विद्यार्थ्यांनी “लोकशाहीची शाळा” लोकोत्सव या अभिरुप मतदान प्रक्रिया आणि मतमोजणी, शपथविधी मोठ्या उत्साहाने संपन्न झाला.
“पोल डे” च्या दिवशी झालेल्या शालेय वर्ग मंत्रिमंडळ निवडणुकीच्या दिवशी मतदान केंद्राचे उद्घाटन स्वीप कक्षाचे सहाय्यक अधिकारी तथा नेवासा बुद्रुकचे केंद्रप्रमुख बाळासाहेब काशीद यांच्या हस्ते तिरंगी रंगाचे फुगे लावून सजवलेल्या मतदान केंद्राचे उद्घाटन फीत कापून झाले.
यावेळी बीएलओ कर्मचारी किशोर जाधव यांच्यासह पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी शाळेच्या मुख्याध्यापिका सरिता सावंत यांनी उपस्थितीचा शाळेच्या वतीने स्वागत केले.
यावेळी केंद्रप्रमुख काशीद म्हणाले की, शालेय जीवनात विद्यार्थ्यांना लोकशाही पद्धतीने अभिरुप मतदान प्रक्रिया हा सहशालेय उपक्रम कौतुकास्पद आहे. सशक्त भारताची लोकशाही घडवण्याचे आधारस्तंभ हे कुमारवयीन मुले आहेत. त्यांनी विद्यार्थी उमेदवारांशी व मतदान कर्मचारी यांच्याशी संवाद साधला. मुख्याध्यापिका सरिता सावंत यांनी विदयार्थ्यांना लोकशाही प्रक्रिया,मतदानाचा हक्क व एका मताचे महत्व, नोटा बद्दल माहिती सांगत मतदान जनजागृती केली.
वर्गशिक्षक राहुल आठरे यांनी शालेय वर्ग मंत्रिमंडळ निवडणूक कार्यक्रम अधिसूचना जुलै महिन्यात जाहीर केल्यानंतर उमेदवारांनी डिपॉझिट रक्कम जमा करत फॉर्म घेतले. आलेल्या फॉर्मची छाननी करत त्यातून अंतिम उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली. उमेदवारांना चिठ्ठीद्वारे चिन्ह वाटप करत त्यानंतर नमुना मतपत्रिका प्रसिद्ध केली. मतदान घेण्यासाठी शाळेतील इतर वर्गातील विद्यार्थ्यांची निवडणूक कर्मचारी,पोलीस कर्मचारी म्हणून नियुक्ती केली.
प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी उमेदवारा समक्ष मतपेटी लाखेने सीलबंद करत मतपत्रीकेवर रबरी फुलाचा शिक्का मारत गुप्त पद्धतीने मतदान घेतले. मतदान संपल्यावर पुन्हा मतपेटी सर्वांसमोर सीलबंद केली. यावेळी अभिरुप निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सरिता सावंत,सहाय्यक अधिकारी म्हणून सरस्वती लोंढे,मनीषा साळवे,शितल झरेकर-आठरे,अमोल तुपे आदींनी कामकाज पाहिले.
मतदानाच्या दुसऱ्या दिवशी झालेल्या मतमोजणी नंतर निकालाचे चित्र स्पष्ट होत, शालेय वर्ग मंत्रिमंडळ च्या निवडणुकीत कोमल रोठे याने सर्वाधिक पाच मते जिंकत मुख्यमंत्री ठरली.तर उपमुख्यमंत्री पदी सत्यम धोत्रे याची वर्णी लागली. तसेच या निवडणुकीत ऋतुजा चापे,वैभव पवार,मुक्ता हेलवडे,पूजा माळी व साद शेख यांना मंत्रिपदे मिळाली.
निकालाची घोषणा होताच सर्व विद्यार्थ्यांनी निवडून आलेल्या विजयी उमेदवारांना ढोल ताशाच्या तालावर एकच जल्लोष करत खांद्यावर उचलून घेतले.विजयी उमेदवारांना हार घालून अभिनंदन व शुभेच्छा देत,पेढे भरवत आनंद साजरा करण्यात आला.
“लोकशाहीची शाळा” लोकोत्सव या विधानसभा सार्वत्रिक निवडणूक स्वीप कक्षाच्या उपक्रमांतर्गत भालगाव शाळेत घेण्यात आलेल्या अभिरुप मतदान प्रक्रिया हा विद्यार्थ्यांसाठी लोकशाहीचा अनुभव देणारा धडा आहे.इ.सातवीच्या विद्यार्थ्यांनी अभिरुप मतदान प्रक्रिया राबवत मतदान जनजागृती केली आहे.” -शिवाजी कराड, गटशिक्षणाधिकारी नेवासा
“लोकशाहीची शाळा..” लोकोत्सव उपक्रमांतर्गत व मतदार जनजागृती व्हावी या निमित्ताने वर्गातील विद्यार्थ्यांचे शालेय वर्ग मंत्रिमंडळ निवड केली. अभिरूप मतदान प्रक्रिया राबवून लोकशाहीचा अनुभव दिला.” राहुल आठरे -उपक्रमशील शिक्षक,भालगाव
“लोकशाहीची शाळा” लोकोत्सव या उपक्रमांतर्गत पोल डे च्या दिवशी आमच्या वर्गाची निवडणूक झाली. प्रत्यक्ष निवडणूक प्रकिया समजावून घेत गुप्त पध्दतीने मतदान करण्याचा हक्क बजावला. माझी लोकशाही पद्धतीने मतदान घेऊन वर्गाची मॉनिटर म्हणून निवड झाली.निवडून आल्याने आनंद वाटला..” कोमल रोठे इ.सातवी नवनियुक्त वर्गनायक





