नेवासा । हस्तलिखीत बाराशे बारा ज्ञानेश्वरी सामुदायिक पूजनाचा व पैस खांबाच्या स्पर्श सोहळ्याचे आसोजन

नेवासा – ३ जून रोजी भागवत एकादशी निमित्त ज्ञानेश्वरी हस्तलिखित उपक्रमात पूर्ण झालेल्या बाराशे बारा हस्तलिखित ज्ञानेश्वरीचा सामुदायिक पूजनाचा व पैस खांबाच्या स्पर्शाचा सोहळा आयोजित करण्यात आला आहे त्यानिमित्ताने ज्ञानेश्वर मंदिरामध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती देवस्थानचे अध्यक्ष पांडुरंग अभंग यांनी पत्रकार परिषदेत दिली.
श्री क्षेत्र नेवासा तालुका ही संतांची भूमी असून येथे सांस्कृतिक,अध्यात्मिक,सामाजिक,शैक्षणिक परंपरेचा वारसा लाभलेला आहे.१२ व्या शतकात श्री संत ज्ञानेश्वर महाराजांनी वयाच्या १६ व्या वर्षी या पुण्यभूमी श्री क्षेत्र नेवासा येथे श्रीमद्भगवद्गीतेवर टीका करून प्राकृत भाषेत ज्ञानेश्वरी ग्रंथाची रचना केली,व ज्ञानेश्वरी ग्रंथाचे लिखाण श्री सच्चिदानंदबाबा यांनी केले.
नेवासा तालुक्याला ज्ञानेश्वरी लिखाणाची प्राचीन परंपरा लाभलेली आहे,म्हणून आमदार शंकरराव गडाख यांच्या मनात संकल्पना आली आणि श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरीचे पारायण सोहळे होत असतातच पण ज्ञानेश्वरी लिखाणाचा वारसा घरोघरी जोपासला गेला पाहिजे या भावनेने ज्ञानेश्वरी हस्तलिखिताचा उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला या संकल्पनेसाठी १२१२ ज्ञानेश्वरी लिखाणाच्या कोऱ्या वह्या यशवंत सामाजिक प्रतिष्ठानच्या माध्यमातून श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान,श्री क्षेत्र नेवासा येथून भाविकांना देण्यात आल्या.
या हस्तलिखित ज्ञानेश्वरी उपक्रमासाठी राज्यभरातून तसेच नेवासा तालुक्यातून खुप प्रतिसाद मिळाला लिखाणासाठी वह्या घेतलेल्या भाविकांनी दिलेल्या वेळेत लिखाण पूर्ण केले आहे.विशेषतः तरुण मुला-मुलींचा सहभाग यावेळी खूप मोठा चांगला दिसून आलेला होता
जेष्ठ साहित्यिक माजी खासदार यशवंतराव गडाख यांच्या उपस्थितीत होत असलेल्या या उपक्रमात गुरुवर्य भास्करगिरीजी महाराज,रामभाऊ महाराज राऊत, मीराबाई मिरीकर,उद्धव महाराज मंडलिक नेवासकर यांच्यासह आमदार शंकरराव गडाख व माजी आमदार नरेंद्र पाटील घुले यांच्या हस्ते ग्रंथ पूजन होणार आहे यावेळी तालुक्यातील सर्व संत महात्मे यांना निमंत्रण देण्यात आले आहे त्यासोबत मंदिरातील गुरुवर्य बन्सी महाराज तांबे वस्तू संग्रहालयाचे देखील उद्घाटन होणार आहे व संत ज्ञानेश्वर महाराज गार्डन उद्घाटन करण्यात येणार आहे आणि मंदिराची ऑनलाइन सेवा देखील चालू करण्यात येणार आहे अशी माहीती यावेळी ज्ञानेश्वर देवस्थानचे अध्यक्ष पांडुरंग अभंग यांनी माध्यमांशी बोलतांना दिली.





