नेवासा : शाळा-महाविद्यालय परिसरात छेडछाड विरोधी पथक नेमावे – डॉ. मनिषा वाघ

नेवासा : नेवासा येथील शाळा-महाविद्यालय परिसरात मुलींची छेडछाड करणाऱ्या मुलांवर कारवाईसाठी छेडछाड विरोधी पथक नेमावे आणि तातडीच्या मदतीसाठी ‘हेल्पलाइन’ सुरू करावी, अशी मागणी भाजप वैद्यकीय आघाडीच्या महाराष्ट्र प्रदेश सहसंयोजक डॉ. मनिषा वाघ यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी नेवासा पोलीस स्टेशनचे निरीक्षक धनंजय जाधव यांना निवेदन दिले. मागण्या मान्य न झाल्यास पालकमाता आणि विद्यार्थिनींसह रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला.
डॉ. वाघ यांनी निवेदनात म्हटले की, नेवासा शहरातील शाळांबाहेर टवाळखोर मुलांकडून विद्यार्थिनींची छेडछाड वाढली आहे. बदामबाई गांधी विद्यालयाजवळील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तोडफोड झाली असून, शाळा सुटल्यानंतर बसस्थानकाकडे जाणाऱ्या मुलींना त्रास होतो. पालकांनी याबाबत अनेक तक्रारी केल्या आहेत.
यावर उपाय म्हणून प्रत्येक शाळा, महाविद्यालय आणि बसस्थानक परिसरात छेडछाड विरोधी पथक नेमावे, अशी मागणी आहे. निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना पाठवण्यात आल्या. निवेदन देताना भाजप महिला मोर्चाच्या प्रदेश सचिव अमृता नळकांडे आणि गीता पारखे उपस्थित होत्या.





