नेवासा: न्यायालयाच्या नवीन इमारतीसाठी 51 कोटींच्या खर्चास प्रशासकीय मान्यता – आमदार लंघे

नेवासा – जिल्हा न्यायालयाच्या नवीन इमारतीसाठी ५१ कोटी रुपयांच्या खर्चास प्रशासकिय मान्यता देण्यात आली आहे. याबाबतची माहीती आमदार विठ्ठलराव लंघे – पाटील यांनी दैनिक प्रभात’शी बोलतांना दिली. नेवासा न्यायालयाची सध्या असलेली ही इमारत न्यायालयीन कामकाजासाठी अपुरी पडत आहे. या इमारतीमध्ये दोन जिल्हा न्यायाधिश, दोन वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायाधिश तसेच चार कनिष्ठस्तर दिवाणी न्यायाधिश या इमारतीमध्ये कामकाज करतात.
सदर इमारत ही न्यायालयीन कामासाठी अपुरी पडत असल्यामुळे काम करण्यासाठी पक्षकार व वकिलांची तसेच न्यायालयाची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत होती. त्यासाठी नविन जिल्हा न्यायालयाची इमारत होणे अत्यंत आवश्यक बाब बनलेली होती. या बाबींचे आमदार विठ्ठलराव लंघे – पाटील यांनी लक्ष घालूून जिल्हा न्यायालयाच्या नुतन इमारतीसाठी ५१ कोटी रुपयांच्या खर्चास प्रशासकिय मान्यता दिली आहे.
नेवासा येथे जिल्हा न्यायालयाची स्थापना झाल्यापासून जिल्हा न्यायालयाच्या इमारतीसाठी वकिल संघाचा नेहमीच पाठपुरावा सुरू होता. तसेच सदर नवीन इमारतीसाठी जागा उपलब्ध झाल्यानंतर बांधकामासाठी निधी आवश्यक असल्याने त्यासाठी नेवासा वकिल संघाने वेळोवेळी प्रशासकिय पातळीवर प्रयत्न केले होते. सदर निधी उपलब्ध व्हावा म्हणून नेवासा वकिल संघाचे अध्यक्ष अॅड.कल्याणराव पिसाळ व कार्यकारणीने त्यासाठी आवश्यक तो सर्व पाठपुरावा केलेला आहे. सदर कामासाठी वकील संघाने वेळोवेळी मुंबई व नागपुर येथे जाऊन इमारतीसाठी निधी उपलब्ध करण्याची मागणी केलेली होती.
या न्यायालयीन इमारतीसाठी निधी उपलब्ध व्हावा म्हणून आमदार विठ्ठलराव लंघे – पाटील यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे – पाटील यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा केला. मंत्रलयातील उच्चस्तरीय कमिटीची तातडीची बैठक बोलावून नेवासा न्यायालयाचे इमारतीसाठी ५१ कोटी २३ लाख रुपयाच्या खर्चास प्रशासकिय मान्यता मिळवून दिली आहे. त्यामुळे इमारतीचे बांधकाम सुरु होण्यासाठी आता मुख्य अडथळा दूर झालेला आहे.
या इमारतीच्या कामाचा पाठपुरावा नेवासा वकिल संघ व पालक न्यायमुर्ती कंकनवाडी, न्यायमुर्ती चपळगांवकर, जिल्हा न्यायाधिश यलगड्डा व जिल्हा न्यायाधिश शेंडे व विधी व बांधकाम विभागातील सर्व सचिव यांनी त्यासाठी विशेष प्रयत्न केले. सदर निधीस प्रशासकिय मंजुरी मिळाल्याबद्दल नेवासा वकिल संघामध्ये व पक्षकारामध्ये समाधानाचे वातावरण असून वकिल संघाने राधाकृष्ण विखे – पाटील व आमदार विठ्ठलराव लंघे – पाटील याचे विशेष कौतुक करत अभिनंदन केले.





