नेवासा: शनिशिंगणापूरात कोट्यवधींचा घोटाळा, तरीही भाविकांची श्रद्धा अढळ!

नेवासा (राजेंद्र वाघमारे): नेवासा तालुक्यातील जगप्रसिद्ध श्री शनैश्वर देवस्थान, शनिशिंगणापूर येथे भाविकांची साखळी पद्धतीने लूट होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पार्किंग व्यवस्थेपासून ते विकतच्या दर्शनापर्यंत आणि पूजा साहित्यापासून अभिषेकापर्यंत भाविकांचा भोळ्या श्रद्धेचा गैरफायदा घेतला जात आहे. यामुळे काही सर्वसामान्य कर्मचारी लखपती, तर काही अधिकारी, आजी-माजी विश्वस्त आणि पदाधिकारी कोट्यधीश बनले आहेत.
या देवस्थानात प्रसाद विक्री आणि अभिषेक घालणारे भटजी देखील बनावट ॲप घोटाळ्यात सहभागी असल्याचा आरोप आहे. ऑनलाइन दर्शन, अभिषेक, साडेसाती निवारण पूजा यांसारख्या सेवांसाठी भाविकांकडून ५०० ते ५,००० रुपये आकारले जात असून, या रकमा देवस्थानच्या अधिकृत खात्यात जमा होत नसल्याचे तपासात उघड झाले आहे. यामुळे भ्रष्टाचाराचा आकडा तब्बल ५०० कोटींवर गेल्याचा दावा केला जात आहे. प्रसादालयातील कर्मचारी आणि भटजींपासून ते विश्वस्तांपर्यंत सर्वच या काळ्या कारनाम्यात सामील असल्याच्या तक्रारी भाविकांकडून येत आहेत.
या साखळी पद्धतीच्या लुटीमुळे भाविकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. “शनीदेवाचा कोप लुटारूंवर कधी उलटणार?” असा सवाल भक्तगणांमधून उपस्थित होत आहे. देवस्थान प्रशासनाने या गैरप्रकारांवर अंकुश ठेवण्याऐवजी त्यातच सहभाग घेतल्याचा आरोप आहे, ज्यामुळे भाविकांमध्ये संताप आहे. “दाद कोणाकडे मागायची?” असा यक्षप्रश्न भाविकांना पडला आहे.
दुसरीकडे, शनिशिंगणापूर गावाची ख्याती घरांना दरवाजे नसलेले आणि चोरीला आळा घालणारे शनिदेव यांच्यामुळे जगभर आहे. “चोरी करणाऱ्याला शनिदेव सोडत नाही,” अशी भाविकांची श्रद्धा आहे. या लुटीच्या प्रकारानंतरही भाविकांची शनिदेवावरील श्रद्धा कायम असून, दररोज होणारी गर्दी त्याचे द्योतक आहे. मात्र, या भ्रष्ट कारभारामुळे शनिदेव स्वतःच साडेसातीच्या फेऱ्यात अडकल्यासारखे चित्र निर्माण झाले आहे.
मुंबई धर्मादाय आयुक्त कार्यालयाने याप्रकरणी गंभीर दखल घेत सर्व ११ विश्वस्तांना नोटिसा बजावल्या असून, कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत. यापुढे अशा गैरव्यवहारांना आळा बसावा, अशी अपेक्षा भाविक व्यक्त करत आहेत.





