नेवासा: 903 जणांनी 10 मिनिटांत केले संपूर्ण ‘ज्ञानेश्वरी पारायण’

नेवासा – ग्रंथराज ‘ज्ञानेश्वरी’ जयंती निमित्ताने नेवासा शहरात शोभायात्रा मिरवणुक काढण्यात आली. या मिरवणूकीचे नेवासा शहरात उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. सायंकाळी झालेल्या दीपोत्सवाद्वारे दहा मिनिटात ज्ञानेश्वरी पारायणाचा पार पडला. यावेळी पुंडलिक वरदे हरि विठ्ठल ..श्री ज्ञानदेव तुकाराम ..च्या गजराने ज्ञानेश्वर मंदिर परिसर दुमदुमला होता. नेवासा हे ज्ञानेश्वरी रचना स्थान आहे.
हा अभिनव सोहळा भेंडे येथील रामेश्वर महाराज कंठाळे यांच्या संकल्पनेतून ज्ञानेश्वरी रचना स्थान विश्वस्त मंडळ, तमाम पंचक्रोशी ज्ञानेश्वरी भक्त परिवार यांच्या उपस्थितीत पार पडला.
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींनी जे ज्ञानामृत नेवासेनगरीत सांगितले त्यास 733 वर्षे पूर्ण होत आहेत. तर एकनाथ महाराजांनी दुरुस्त केलेल्या ज्ञानेश्वरीला 439 वर्ष पूर्ण होत आहे. त्यानिमित्त बुधवारी दुपारी चार वाजता ज्ञानेश्वरी रचना स्थान श्रीक्षेत्र नेवासा येथून ग्रंथराज ज्ञानेश्वरीची भव्य मिरवणूक टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये काढण्यात आली. या मिरवणुकीचे नेतृत्व हभप रामेश्वर महाराज कंठाळे व रामायणाचार्य नंदकिशोर महाराज खरात यांनी केले.
मिरवणूकीचे नेवासेकरांनी चौकाचौकात उत्स्फूर्त स्वागत केले. सदरची शोभायात्रा मिरवणूक ग्रामदैवत श्री. मोहिनीराज मंदिर प्रांगणात आली असता अभियंता सुनीलराव वाघ, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सतीश मुळे, पुणे येथील संत सेवा मंडळाचे मंगेश पडवळ, आमदार शंकरराव गडाख युवा मंचचे प्रा. सुनील गर्जे, यशवंत स्टडी क्लबचे महेश मापारी, नगरसेवक राजेंद्र मापारी जयदीप जामदार, प्रेस क्लबचे संपर्क प्रमुख सुधीर चव्हाण, मकरंद देशपांडे यांनी हार घालून ग्रंथराज ज्ञानेश्वरीचे पूजन केले.
मिरवणूकीचा समारोप मंदिर प्रांगणात झाल्यानंतर एका ओवीला एक दिवा याप्रमाणे नऊ हजार तेहतीस दिवे लावून दीपोत्सव साजरा करण्यात आला.
त्यानंतर एका व्यक्तीस दहा ओवी याप्रमाणे एकाच वेळेस 903 व्यक्तींनी ठरवून दिलेल्या अध्यायातील दहा ओवीचे सामूहिक पारायण केले. त्यामुळे केवळ दहा मिनिटांमध्येच संपूर्ण ९ हजार ३३ ओव्यांचे पारायणाची विक्रमी नोंद झाली. यावेळी सामूहिक ग्रंथराज ज्ञानेश्वरीची आरती करण्यात आली.
दरम्यान, प्रतिवर्षीप्रमाणे पुणे येथील मंगेश पडवळ यांच्या नेतृत्वाखाली संतसेवा भक्त मंडळ गेले काही वर्षापासून नेवासा येथे ज्ञानेश्वर जयंती निमित्त ज्ञानेश्वरी पूजन व ज्ञानेश्वरी ची मिरवणूक काढते. यावर्षी देखील या भक्तमंडळांनी ज्ञानेश्वरीच्या मिरवणुकीचे नियोजन पैठण व नेवासे येथे केले होते.





