नेवासा! दहावीच्या निकालात सर्व विषयांत ३५ गुण; अनोख्या यशामुळे विद्यार्थ्याचं तालुक्यात कुतूहल

नेवासा: इयत्ता दहावीच्या शालांत परीक्षेत किमान ३५ टक्के गुण मिळवणारा विद्यार्थी उत्तीर्ण होतो. याच निकषावर नेवासा शहरातील संभाजीनगर प्रभागात राहणाऱ्या आणि ज्ञानोदय इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षण घेणारा रवि राजेंद्र धनवटे या विद्यार्थ्याला सर्व विषयांत तंतोतंत ३५ गुण मिळवत ३५ टक्क्यांसह दहावीची परीक्षा उत्तीर्ण केली.
एकाही विषयात जादा किंवा कमी गुण न मिळाल्याने त्याची चर्चा नेवासा शहरासह संपूर्ण तालुक्यात रंगली आहे. रवीने परीक्षेत यश मिळवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. त्याच्या मेहनतीचे फळ म्हणजे प्रत्येक विषयात अचूक ३५ गुण मिळाले. “काठावर पास” म्हणण्याची पद्धत असली, तरी रवीच्या या अनोख्या यशामुळे नेवासा तालुक्यात कुतूहल निर्माण झाले असून, त्याच्या नावाची जोरदार चर्चा होत आहे. रवीच्या काठावर पासच्या यशाबद्दल शाळेतील शिक्षक आणि पालकांनी कौतुक केले आहे.





