नेवासा: 14 दिवसांत 1559 किमी सायकल प्रवास; सचिन कुटे यांचा प्रेरणादायी विक्रम!

नेवासा- नेवासा बुद्रूक (जिल्हा -अहिल्यानगर) येथील सचिन कुटे यांनी जिद्द आणि आत्मविश्वासाच्या जोरावर अशक्य वाटणारी गोष्ट शक्य करून दाखवली आहे. या धाडसी तरुणाने अवघ्या 14 दिवसांत तब्बल 1559 किलोमीटरचा सायकल प्रवास पूर्ण करून जिल्ह्यात नवा इतिहास रचला आहे. नेवासा बुद्रूक येथील एस कॉर्नर परिसरातील रहिवासी असलेल्या सचिन यांनी मनाशी ठाम निश्चय केला आणि दररोज 100 किलोमीटरहून अधिक अंतर सायकलवर कापत हे आव्हान यशस्वी केले. सकाळी 6 ते संध्याकाळी 7 या वेळेत सायकल चालवत त्यांनी अडचणी आणि वेदना सहन करून हा प्रवास पूर्ण केला.
सचिन यांचा हा प्रवास केवळ दर्शनासाठी नव्हता, तर लोकांना सक्रिय जीवनशैली आणि आरोग्याची महत्ता पटवून देणारा एक संकल्प होता. “आजकाल लोक व्यस्त जीवनात आणि स्क्रीन टाइममध्ये इतके गुरफटले आहेत की, आरोग्याकडे दुर्लक्ष होतं. व्यायामासाठी वेळ काढावा,” असं त्यांनी ठामपणे सांगितलं. प्रवासादरम्यान आई-वडील, पत्नी, राजेंद्र कुरुंद, प्रकाश जोशी यांच्यासह अनेकांनी फोनवरून त्यांचं मनोबल वाढवलं.
नेवासा फाटा येथे परतल्यावर मित्र-परिवाराने फटाक्यांच्या आतिशबाजीने त्यांचं जंगी स्वागत केलं. गणेश वरखडे, डॉ. मोहनराव कुटे, सचिन गायकवाड यांच्यासह अनेकांनी त्यांचा सन्मान केला. भामाठाण येथे अरुणगिरीजी महाराज यांच्या आशीर्वादाने अयोध्या, काशी येथून आणलेल्या गंगाजलाने अडबंगीनाथ तप शिळेचं पूजन आणि आई-वडिलांचं गंगाजलाने पूजन त्यांनी केलं. सचिन यांनी तंदुरुस्तीचा पुरावा तर दिलाच, पण इतरांसाठीही एक प्रेरणादायी आदर्श ठेवला आहे.





