नवी दिल्ली : विद्यापीठ आणि कॉलेजमध्ये सहाय्यक प्राध्यापक म्हणून काम करणाऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. विद्यापीठ अनुदान आयोग म्हणजेच यूजीसीने सहायक प्राध्यापक पदांवर भरतीसंदर्भात नवा ड्राफ्ट जारी केला आहे. यानुसार एमई आणि एमटेक उमेदवारांना नेट क्वालिफाइड करण्याची गरज नसेल. कुलगुरुंच्या पदभरती संदर्भातील नियमात बदल करण्यात आले आहेत. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी शैक्षणिक संस्थांतील भरती, प्रमोशन आणि व्हीसी भरतीसंदर्भात गाईडलाइन्स जारी केले आहेत. यूजीसीने जारी केलेल्या ड्राफ्टनुसार, किमान 55 टक्के गुणांसह मास्टर ऑफ इंजिनीअरिंग (एमई) आणि मास्टर्स ऑफ टेक्नोलॉजी (एमटेक) मध्ये पीजी डिग्री असलेल्यांना थेट सहायक प्राध्यापक भरतीची परवानगी मिळणार आहे. यासाठी त्यांना नेट क्वालिफाइड होण्याची आवश्यकता नसणार आहे. उमेदवारांना त्यांच्या सर्वोच्च शैक्षणिक कौशल्याच्या आधारे शिकवण्याची परवानगी देण्यासाठी UGC द्वारे नियम तयार केले जात आहेत. यानुसार आता कोणत्याही विषयात यूजी आणि पीजीचे शिक्षण घेतलेले पण पीएचडी किंवा नेट विषय असलेले प्राध्यापक पदासाठी अर्ज करू शकतात. कुलगुरूंसाठी नवीन नियम लागू नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार, आता कुलगुरू पदावर नियुक्तीसाठी उमेदवाराला 10 वर्षांचा अध्यापनाचा अनुभव असणे आवश्यक नाही. संबंधित क्षेत्रात 10 वर्षे काम केलेले आणि चांगला ट्रॅक रेकॉर्ड असलेले क्षेत्रतज्ज्ञ या पदासाठी पात्र असतील, तर आतापर्यंत शिक्षणतज्ज्ञ म्हणून 10 वर्षांचा कार्यकाळ आवश्यक होता. समान विषयाची अट नाही सहाय्यक ते सहयोगी प्राध्यापक पदोन्नतीसाठी उमेदवारांना पीएचडी पदवी अनिवार्य असणार आहे. या पदवीशिवाय उमेदवारांना पदोन्नती मिळू शकणार नाही. आतापर्यंत सहाय्यक प्राध्यापक पदांच्या भरतीसाठी पीजी आणि नेटचे विषय समान असायला हवे होते, मात्र आता ही अट रद्द करण्यात आली आहे.आतापर्यंत सहाय्यक प्राध्यापक पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांना पीजी आणि नेटचा एकच विषय असायला हवा होता, मात्र आता त्याची गरज भासणार नाही.