Nepal : नेपाळ पुन्हा हिंदू राष्ट्र बनणार..! नेपाळमध्ये राजेशाही समर्थक पक्षाची निदर्शने

काठमांडू – नेपाळमध्ये राजेशाही समर्थक राष्ट्रीय प्रजातंत्र पार्टीने आज पंतप्रधान आणि संसद भवन असलेल्या अतिसुरक्षित परिसरामध्ये निदर्शने केली. नेपाळमध्ये राजेशाही पुन्हा एकदा लागू करण्यात यावी आणि देशाला हिंदू राष्ट्र घोषित करण्यात यावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
राष्ट्रीय प्रजातंत्र पक्षाचे सुमारे १,५०० समर्थक बिजुलीबाजार-बनेश्वर परिसरात फलक घेऊन जमले आणि त्यांनी प्रजासत्ताक व्यवस्था मुर्दावाद, आम्हाला राजेशाही परत हवी आहे आणि नेपाळला हिंदू राज्य म्हणून स्थापित करा, अशा घोषणा दिल्या. या निदर्शनाचे नेतृत्व आरपीपीचे अध्यक्ष राजेंद्र लिंगडेन, ज्येष्ठ नेते पशुपती शमशेर राणा आणि माजी पोलीस महानिरीक्षक ध्रुब बहादूर प्रधान आदींनी केले.
सरकारच्या आदेशाचे उल्लंघन करून प्रतिबंधित क्षेत्रात प्रवेश करण्याची घोषणा निदर्शकांनी केल्यामुळे काठमांडूच्या नया बानेश्वर, बिजुलीगाजार, मैतीघर, भद्रकाली आणि बालुवातारसह संवेदनशील भागात हजारो दंगल विरोधी पोलिस तैनात करण्यात आले होते.
सरकारने काठमांडूमधील नवीन बानेश्वर येथील राष्ट्रीय संसद इमारतीच्या आजूबाजूचा परिसराचा समावेश असलेली अनेक ठिकाणे प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केला आहे. या प्रतिबंधित क्षेत्रात प्रवेश करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल आरपीपीचे अध्यक्ष लिंगदेन, उपाध्यक्ष बुद्धिमान तमांग आणि प्रवक्ते ज्ञानेंद्र शाही यांच्यासह किमान सात नेते आणि कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली.





