Balen Shah Nepal’s next PM: रॅपर ते पंतप्रधान! नेपाळमध्ये 35 वर्षीय बालेन शाह यांचा धमाका; दिग्गज नेत्यांना घरचा रस्ता!
Balen Shah Nepal's next PM: १५० मतदारसंघांतील मतमोजणी सुरू असताना RSP ने दोन जागी विजय मिळवला असून आणखी १०६ जागांवर आघाडी घेतली आहे.

Balen Shah Nepal’s next PM: नेपाळमध्ये सप्टेंबर २०२५ मधील Gen Z आंदोलनानंतर झालेल्या पहिल्याच निवडणुकीत मतदारांनी जुन्या राजकीय नेत्यांना स्पष्ट नकार दिला आहे. राष्ट्रीय स्वतंत्र पार्टी (RSP) या केवळ तीन वर्षे जुन्या पक्षाला मतदारांनी भरभरून कौल दिला असून पक्षाचे नेते बालेंद्र ‘बालेन’ शाह हे नेपाळचे पुढील पंतप्रधान होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
मतमोजणीत RSP चा दणदणीत विजय –
१५० मतदारसंघांतील मतमोजणी सुरू असताना RSP ने दोन जागी विजय मिळवला असून आणखी १०६ जागांवर आघाडी घेतली आहे. नेपाळी काँग्रेसने एक जागी विजय मिळवला असून ११ जागांवर आघाडी आहे. CPN-UML ने १२ मतदारसंघांत आघाडी घेतली आहे. पुष्प कमल दहल ‘प्रचंड’ यांचा माओइस्ट गट आणि माधव कुमार नेपाळ यांचे युनायटेड सोशलिस्ट यांच्यासह १९ कम्युनिस्ट गटांची एकत्रित आघाडी नेपाळी कम्युनिस्ट पार्टी ९ जागांवर पुढे आहे. नेपाळच्या २७५ सदस्यांच्या प्रतिनिधिसभेत १६५ जागा थेट निवडणुकीद्वारे भरल्या जातात, तर उर्वरित ११० जागा प्रमाणशीर प्रतिनिधित्व पद्धतीने निश्चित होतात. या जागांचे निकाल शनिवारी जाहीर होणार आहेत.
बालेन शाह कोण आहेत?
३५ वर्षीय बालेन शाह हे रॅपर म्हणून सुरुवात करून राजकारणात आलेले आणि काठमांडूचे माजी महापौर राहिलेले एक वेगळ्याच प्रकारचे नेते आहेत. झापा-५ या मतदारसंघातून त्यांनी माजी पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांच्यावर मोठी आघाडी घेतली आहे. Gen Z आंदोलनाने ओली सरकार हटवल्यानंतर नव्या पिढीचे नेतृत्व म्हणून बालेन शाह यांच्याकडे पाहिले जात आहे.
जुन्या नेत्यांचा धुव्वा –
या निवडणुकीत नेपाळच्या जुन्या राजकारणातील मातब्बर नेत्यांना मतदारांनी घरी बसवले आहे. माजी पंतप्रधान के. पी. शर्मा ओली, UML उपाध्यक्ष बिष्णू पौडेल, राष्ट्रीय प्रजातंत्र पार्टीचे प्रमुख राजेंद्र लिंगदेन आणि त्यांचे पूर्वसुरी कमल थापा, नेपाळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शेखर कोईराला, अब्जाधीश उद्योगपती बिनोद चौधरी, जनमत पार्टीचे सी. के. राऊत, जनता समाजवादी पार्टीचे नेते उपेंद्र यादव, NCP नेते व माजी पंतप्रधान माधव कुमार नेपाळ आणि माजी सभापती देव राज घिमिरे हे सर्व पिछाडीवर आहेत.
प्रचंड मात्र टिकले; गागन थापा चुरशीत –
जुन्या नेत्यांचा धुव्वा उडत असतानाही माजी पंतप्रधान प्रचंड मात्र रुकुम पूर्व मतदारसंघातून विजयी झाले आहेत. नेपाळी काँग्रेसचे गागन कुमार थापा सरलाही-४ मतदारसंघात अत्यंत कमी मतांच्या फरकाने पिछाडीवर आहेत.
रबी लामिछाने यांचे महत्त्व –
RSP चे प्रमुख रबी लामिछाने, जे माजी सरकारमध्ये गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री होते, ते या प्रचंड जनादेशाच्या जोरावर पक्षावर पूर्ण नियंत्रण ठेवणार आहेत. Gen Z आंदोलनाने नेपाळच्या राजकारणाला नवी दिशा दिली असून जुन्या पिढीच्या भ्रष्ट आणि अकार्यक्षम नेतृत्वाला नाकारून मतदारांनी बदलाची स्पष्ट भूमिका घेतल्याचे या निकालातून दिसून येत आहे.





