Nepal Flood : नेपाळच्या महापुरात पुण्यातील 4 पर्यटक अडकले; नावं आणि लोकेशन समोर
Nepal Flood : कैलास मानसरोवर यात्रा करून परतताना जिलोंग सिटीमध्ये अडकले; चौघेही सुखरूप, कुटुंबीयांशी संपर्क

Nepal Flood : नेपाळच्या रसुवा जिल्ह्यात भोटेकोशी नदीला आलेल्या भीषण पुरामुळे मोठी परिस्थिती निर्माण झाली आहे. या महापुरात महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील कैलास मानसरोवर यात्रेला गेलेले चार पर्यटक अडकले आहेत. हे चारही जण सध्या जिलोंग सिटीमध्ये असून सुखरूप असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. चौघांचा त्यांच्या कुटुंबीयांशी संपर्क झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातून कैलास मानसरोवर यात्रेसाठी गेलेले हे चार भाविक यात्रा पूर्ण करून परतीच्या मार्गावर होते. मात्र, अचानक भोटेकोशी नदीला आलेल्या महापुरामुळे त्यांचा प्रवास अडचणीत आला. त्यामुळे स्मिता पवार, योगिनी पाटील, दिनेश भोसले आणि पूजा भोसले हे चौघे जिलोंग सिटीमध्ये अडकले आहेत.
नेपाळमधील या पुरामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून अनेक नागरिक आणि पर्यटक अडकले आहेत. या पार्श्वभूमीवर पुण्यातील चारही पर्यटकांना सुरक्षितपणे महाराष्ट्रात परत आणण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. चारही जण सुरक्षित असून त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांच्याशी चर्चा केल्याची माहितीही समोर आली आहे.
महाराष्ट्र सरकारकडून हेल्पलाईन आणि माहिती नोंदणीची सुविधा –
नेपाळमधील रसुवा जिल्ह्यातील पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील अडकलेल्या नागरिकांची माहिती संकलित करून त्यांना आवश्यक मदत मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून प्रयत्न सुरू आहेत.
नेपाळमध्ये अडकलेल्या नागरिकांच्या कुटुंबीयांनी प्रशासनाला संबंधित व्यक्तीचे नाव, मोबाईल क्रमांक, नेपाळमधील सध्याचे ठिकाण किंवा हॉटेल, प्रवासाचा तपशील आणि कुटुंबीयांचा संपर्क क्रमांक उपलब्ध असल्यास तो द्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
माहिती नोंदवण्यासाठी लिंक:
https://geospatial.mahaseoc.in/Sahayata_gulf/
तसेच नेपाळमध्ये अडकलेल्या पर्यटकांबाबत प्रशासनाशी संपर्क साधण्यासाठी 1077 हा टोल फ्री क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला आहे.




